Dailyhunt
बंगालमध्ये 'झोल'मुडी, ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का! भाजपची सत्ता!! ममता यांचा अनपेक्षित पराभव; सुवेंदू अधिकारी 15 हजार मतांनी जिंकले

बंगालमध्ये 'झोल'मुडी, ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का! भाजपची सत्ता!! ममता यांचा अनपेक्षित पराभव; सुवेंदू अधिकारी 15 हजार मतांनी जिंकले

सामना 2 weeks ago

सआयआरचा घोळ… मतदार यादीतून वगळण्यात आलेली 91 लाख नावे… ईडी-सीबीआयचे धाडसत्र… पंतप्रधानांसह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेला प्रचार आणि बंदोबस्तासाठी उतरवलेला सीआरपीएफ, सीआयएसएफ व एनआयएचा फौजफाटा… अशा अभूतपूर्व वातावरणात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. भाजपने 200 हून जास्त जागा जिंकल्या. खुद्द ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून अनपेक्षित पराभव झाला. पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान खाल्लेल्या बंगाली 'झालमुडी'चे स्टॉल लावून भाजप कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. मात्र, हा निकाल झालमुडीचा नसून 'झोल'मुडीचा आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली आहे.

बंगालमध्ये 294 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 92 टक्क्यांहून जास्त मतदान झाले होते. ममतांना हरवण्यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपने सर्व शक्तीनिशी ही निवडणूक लढवली. केंद्र सरकारची सर्व यंत्रणा त्यासाठी वापरण्यात आली. पंतप्रधानांसह अख्खे मंत्रिमंडळ प्रचाराच्या मैदानात होते. अशा परिस्थितीतही हार न मानता प्रचाराच्या मैदानात तृणमूलने भाजपला अखेरपर्यंत जोरदार टक्कर दिली. त्यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. भाजप आणि तृणमूलला फिफ्टी-फिफ्टी संधी असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात भाजपला अपेक्षेपेक्षा खूप जास्त जागा मिळाल्या. तृणमूलला फक्त 83 जागांवर समाधान मानावे लागले.

पह्टो-व्हिडीओ फिरू लागले!

भाजपच्या अभूतपूर्व विजयावर देशभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरोधकांसह नेटकऱ्यांनीही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा विजय निर्भेळ नसल्याचा पुरावा म्हणून अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले जात आहेत. तृणमूलचे उमेदवार व कार्यकर्त्यांना पोलीस व सुरक्षा अधिकाऱ्यांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांचे व्हिडीओ यात आहेत. निवडणूक आयोगाच्या पक्षपातावरही अनेकांनी बोट ठेवले आहे.

प्रति बाबरीची घोषणा करणारे हुमायूं कबीर यांचा दोन जागांवर विजय

बंगालमध्ये 'प्रति बाबरी' उभारण्याची घोषणा करणारे हुमायूं कबीर यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. मुर्शिदाबादमधील नावदा आणि रेजीनगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. नावदामध्ये त्यांनी भाजपचे राणा मंडल यांचा 27943 मतांनी पराभव केला, तर रेजीनगरमध्ये भाजपच्या बपन घोष यांचा 58,876 मतांनी पराभव केला. कबीर यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन चार महिन्यांपूर्वी आम जनता उन्नयन पार्टीची स्थापना केली होती.

आर. जी. कर बलात्कार पीडितेच्या आईचा विजय

पश्चिम बंगालमध्ये आर. जी. कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणातील पीडित मुलीची आई रत्ना देबनाथ या पानीहाटी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसचे तीर्थंकर घोष हे उभे होते. मात्र, रत्ना देबनाथ यांनी त्यांचा 28,836 मतांनी पराभव केला. रत्ना यांना 87,977 तर, घोष यांना 59,141 मते मिळाली.

पक्षीय बलाबल 293

  • भाजप 206
  • तृणमूल काँग्रेस 81
  • डावी आघाडी 02
  • काँग्रेस 02
  • इतर 02

तुम्हाला वाटतं का की हा विजय आहे? हा अनैतिक विजय आहे, नैतिक नव्हे! निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दलं, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मिळून जे काही केलंय ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही केवळ लुटालूट आहे, लुटालूट आणि लुटालूटच. आम्ही पुन्हा जोरदार मुसंडी मारू. – ममता बॅनर्जी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana