महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात वॉटर कुलरमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले असून रुग्ण तसेच नातेवाईकांच्या जिवाशी खेळ थांबणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथे रुग्णालय आहे. या रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या एका पिण्याच्या पाण्याच्या वॉटर कुलरमध्ये मेलेला उंदीर तरंगताना आढळून आला. हा प्रकार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या नसरीन पठाण यांचे नातेवाईक फरहान वागू यांच्या निदर्शनास आला. पाणी स्वच्छ आहे का? हे पाहण्यासाठी त्यांनी सहजच मशीनचे झाकण उघडले. त्यावेळी त्या वॉटर कुलरमध्ये मेलेला एक उंदीर सडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णाल याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे तक्रार करणाऱ्या नागरिकालाच ड्युटीवरील कर्मचाऱ्याने कशाला कम्प्लेंट करता?, शांत बसा ना अशी दमदाटी व अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार गंभीर असून या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच रुग्णालयामधील पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची तातडीने तपासणी करून तक्रार करणाऱ्या नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. – महेश कोटीवाले, शिवसेना, नवी मुंबई ऐरोली क्षेत्र शहरप्रमुख

