हिंदुस्थानातील विविध राज्यांमधील शाळा, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांना बनावट बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवून दहशत पसरवणाऱ्या श्रीनिवास लुईस याच्याबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे उघड झाले आहे की, लुईसने केवळ हिंदुस्थानपुरत्या मर्यादित नसून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत. विशेष म्हणजे, त्याने पाकिस्तानातील शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांनाही बनावट बॉम्ब कॉल्स आणि ईमेल पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान असे दिसून आले की, आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी डार्क वेब आणि व्हीपीएन (VPN) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. आपला आयपी ॲड्रेस लपवून पोलिसांच्या नजरेतून सुटण्याचा त्याने पद्धतशीर प्रयत्न केला. पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी त्याने गूगल मॅप्सचा आधार घेतला आणि धमक्या देण्यासाठी व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (VoIP) द्वारे कॉल्स केले. या संपूर्ण गुन्हेगारी कृत्यासाठी त्याने 50 हून अधिक बनावट ईमेल आयडी तयार केले होते, ज्याचा वापर करून तो कन्नड आणि इंग्रजी भाषेत धमक्यांचे संदेश पाठवत असे.
दिल्ली पोलिसांनी 27 मार्च रोजी म्हैसूरच्या वृंदावन भागातून श्रीनिवास लुईसला अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अनेक सिम कार्डे जप्त करण्यात आली असून, ही सर्व डिजिटल उपकरणे न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (FSL) तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. लुईस हा एखाद्या मोठ्या संघटित टोळीचा भाग आहे की त्याने हे सर्व कृत्य एकट्यानेच केले आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून येत्या काळात आणखी मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

