बेस्टच्या ताफ्यातील खाजगी कंपन्यांच्या बसगाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीचा गंभीर प्रश्न असतानाच रविवारी दुपारी कुर्ला बस आगारात स्विच मोबिलिटी कंपनीच्या ईलेक्ट्रिक डबलडेकर बसला आग लागली.
काही क्षणांत आगीचा भडका उडून संपूर्ण बसचा अक्षरशः कोळसा झाला. जवळपास तीन तास बसची आग भडकली होती. त्यामुळे गोंधळ व घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
कुर्ला बस आगारात बेसमेंटमध्ये ही बस पार्क करण्यात आली होती. अचानक बसमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्याची माहिती अभियांत्रिकी विभागातील नयन जाधव यांनी अभियांत्रिकी पर्यवेक्षकांना दिली. त्यानंतर 10 ते 15 अग्निशामक फायर बाटल्यांचा वापर करून बसमधील आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपूर्ण बसने पूर्णपणे पेट घेतला. त्यानंतर सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दल तसेच बस कंट्रोल यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी मोठय़ा प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. ही बस नादुरुस्त होती, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
खासगी पंपनीचे अधिकारी बेफिकीर
घटनेवेळी स्विच मोबिलिटी कंपनीचा बेफिकीर कारभार उघडकीस आला. बसला आग लागली, त्यावेळी घटनास्थळी पंपनीच्या अधिकाऱयांनी तातडीने धाव घेतली नाही. पंपनीचे अधिकारी नुरुल हसन हे जवळपास एक तासाने, सायंकाळी 4.40 च्या सुमारास आगारात हजर झाले.

