Saturday, 14 Sep, 8.40 am सामना

मुंबई
भास्कर जाधव यांची घरवापसी, प्रदीप शर्माही शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला कोकणात खिंडार पडले आहे. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही शुक्रवारी सायंकाळी भगवा खांद्यावर घेत शिवसेनेत प्रवेश केला.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची संभाजीनगर येथे भेट घेऊन भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर 'मातोश्री' निवासस्थानी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

माझा अंतरात्मा शिवसैनिकाचा - भास्कर जाधव

मूळचा शिवसैनिक आहे. अंतरात्माच शिवसैनिक असल्यामुळे राष्ट्रवादीत काम करतानाही माझा मूळ स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्या काळात झालेले समज-गैरसमज दूर झाले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे. त्यामुळे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी यावेळी दिली.

आधी गन बोलत होती, आज मन बोलतेय

एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने भगवा खांद्यावर घेतला असून ते यापुढे दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडतील अशी खात्री यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांच्या पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केली. आधी गन बोलत होती, आज मन बोलतेय असेही ते मिश्किलपणे म्हणाले. प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून तिकीट देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यात वावगे काय, असा प्रतिसवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top