Dailyhunt
भय इथले संपत नाही! नसरापूर, पर्वतीपाठोपाठ आता थेऊर; 6 वर्षांच्या चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी गजाआड

भय इथले संपत नाही! नसरापूर, पर्वतीपाठोपाठ आता थेऊर; 6 वर्षांच्या चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी गजाआड

सामना 3 days ago

पुण्यासह जिह्यात सुरू असलेल्या नराधमांच्या काळ्या कृत्यांची मालिका थांबायचे नाव घेईना. नसरापूर येथे चिमुरडीवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर मंगळवारी रात्री पर्वती पायथा परिसरात चिमुरडीवर नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाने उसळलेली संतापाची लाट अद्याप कायम असताना आज थेऊर परिसरात अशीच घटना घडली.

या घटनेत 6 वर्षीय चिमुरडीवर नराधमाने हात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या चिमुरडीने नराधमाचा रागरंग ओळखून तत्काळ आईकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. एकूणच या घटनांमुळे 'भय इथले संपत नाही' अशीच परिस्थिती आहे.

संबंधित 6 वर्षीय मुलगी थेऊर परिसरातील आजोबांच्या घरी सुट्टीला आली होती. घराशेजारी राहणाऱया आरोपीने अल्पवयीन मुलीच्या शरीराला स्पर्श करून तिच्याशी गैरवर्तन केले. घाबरलेल्या मुलीने तत्काळ झालेला प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

पर्वती प्रकरणात नराधमाला कोठडी

पर्वती पायथा परिसरात नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी न्यायालयाने नराधम आजोबाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीला खोलीत बोलवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana