भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. महिलांचे लैंगिक शोषण व कोटय़वधी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असतानाच 70 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी खरातचा ताबा मिळावा यासाठी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला आहे.
लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नाशिक पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने 6 एप्रिल रोजी खरातविरुद्ध मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. खरातने 60 पेक्षा जास्त बेनामी बँक खात्याद्वारे 70 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा व्यवहार केला असून भाविकांना आशीर्वाद म्हणून चिंचोके आणि मध यासारख्या सामान्य वस्तू विकून माया जमा केली आहे.याशिवाय खंडणीच्या माध्यमातूनही अफाट संपत्ती जमवल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. खरातने जमवलेला पैसा कुठे गुंतवला आणि याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत का याचा तपास करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. नाशिक कारागृहात असलेल्या खरातला विशेष न्यायालयात हजर करण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला द्यावेत अशी मागणी ईडीने अर्जात केली आहे.

