Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिघडले सत्तेचे महाद्वार, उघडले स्वर्गाचे दार; नाशिकमध्ये खड्ड्यांनी घेतले सहा बळी

बिघडले सत्तेचे महाद्वार, उघडले स्वर्गाचे दार; नाशिकमध्ये खड्ड्यांनी घेतले सहा बळी

सामना 2 weeks ago

>> बाबासाहेब गायकवाड

कुंभमेळ्याच्या निमित्ताने अख्खे नाशिक खोदून ठेवलेय. खड्डे अपघातात आतापर्यंत सहाजणांचा बळी गेला आहे. अनेक नागरिक जायबंदी झाले, काही मृत्यूशी झुंज देत आहेत, अशी भीषण स्थिती असताना सत्ताधार्‍यांना त्याचे सोयरसुतक नाही.

'पस्तीस-चाळीस हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत, काही दिवस हा त्रास सहन करावाच लागेल, आणखी सहा महिन्यांनी नाशिकचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, थोडक्यात काय तर नाशिक स्वर्गसे सुंदर होईल', असा निगरगट्ट खुलासा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. तोपर्यंत स्वर्गाचा दरवाजा उघडलाय, असेच त्यांचे सांगणे आहे. भूलथापांना बळी पडून जनतेने जे सत्तेचे महाद्वार उघडे करून दिले, ते बिघडल्याने मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खावर डागण्या देण्याचा हा निर्ढावलेपणा सुरू आहे. निकृष्ट दर्जाची कामे, भ्रष्टाचारामुळे किडेमकोड्यांगत माणसांचा बळी घेणारी ही वैकुंठ एक्स्प्रेस थांबविण्यासाठी असंतोषाचे आगेमोहळ उठेल. मंत्री छगन भुजबळांनीही हेच अधोरेखित केले आहे.

भाजपाकडे नाशिक महापालिकेची दुसर्‍यांदा एकहाती सत्ता आली आहे. सर्वांगीण विकासासाठी शहर दत्तक घेण्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने सन २०१७ला पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले. शेकडो कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याने महापालिकेची तिजोरी रिती झाली. पैसे नसल्याने विकासाऐवजी भकासपणा वाट्याला आला. केंद्र व राज्यातील सत्तेच्या दुरुपयोगाने मतदार यादीत केलेला घोळ, ईव्हीएमच्या चमत्काराने यावेळी दुसर्‍यांदा भाजपाने महापालिकेची सत्ता बळकावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गद्दार गटालाही सत्तेचा तुकडा चाखायला दिला. पाशवी बहुमतामुळे एकतर्फी हुकूमशाही कारभार अख्ख्या जिल्ह्यात सुरू आहे. सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री झाले. पालकमंत्रीच नसल्याने तेच सर्वेसर्वा आहेत. कुंभमेळा नियोजन निर्णयात कोणालाच विश्वासात घेतले जात नाही. ठराविक अधिकारी, बगलबच्चे, भाजपधार्जिणे तेही गुजरात व परराज्यातील महाजनांच्या अधिकारवाणीत राहणारे ठेकेदार यांचीच चलती आहे. शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांना विरोधी पक्षाचे असल्याने बैठकांना बोलविलेच जात नाही. अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह त्यांच्या आमदारांनाही फारसे स्थान दिले जात नाही, हे त्यांनीच अनेकदा बोलून दाखविले आहे. महाजनांच्या मर्जीतले संधीसाधू जिल्ह्याचा अन् कुंभमेळा नियोजनाचा गाडा हाकताय.

नाशिकमधील अठ्ठावीस प्रमुख रस्ते गेल्या काही महिन्यांपासून खोदून ठेवल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अन्य प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत सहाजणांचे बळी गेले आहेत, अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत, काही मृत्यूशी झुंज देत आहेत. कर्ता पुरूष, आधार हरपल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत. उपचाराला पैसे नसल्याने कर्जबाजारीपणा आला आहे. अपघाताची मालिका थांबायला तयार नाही. एखादी नैसर्गिक आपत्ती, अचानक आलेल्या संकटाने ही परिस्थिती उद्भवलेली नाही. एकतर्फी हुकूमशाही पद्धतीने निष्क्रिय, भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांचे बळी जात आहेत. क्लब टेंडर, कुंभमेळा कामांच्या बनावट वर्कऑर्डर, ठराविक व परप्रांतीय अपात्र भाजपधार्जिण्यांना ठेके देणे, 'म्हाडा' घोटाळ्यातील ठराविकांना पाठीशी घालणे, नियमावलीच्या आडून 'स्टार रेट'चा सुपरफास्ट घोटाळ्याचा प्रयत्न; वृक्षतोड, वृक्षारोपण; नियमबाह्य पदोन्नत्या, नियुक्त्या असे गैरकारभार सुरू आहेच. आपले कोणीच काही बिघडवत नाही, या निर्ढावलेपणातून कामे अपूर्ण राहिली. केवळ विलंब दंड आकारून संबंधितांना पाठीशी घातले गेले. परिणामी, अख्खे शहर खड्ड्यात गेले. अधिकार्‍यांच्या पाठबळाशिवाय कामे पूर्ण करणे शक्य नाही, ती झाली नाही तर आपली कुंभमेळ्यापर्यंतची टर्म पूर्ण होणार नाही, यासाठी भ्रष्ट, निष्क्रिय अधिकार्‍यांची पाठराखण करण्याशिवाय महापालिका आयुक्तांनाही पर्याय उरलेला नाही. सत्ताधारी नगरसेवकांना सोयीनुसार प्रतिसाद देत त्यांचीच कामे जास्त करायची, निधी वाटपात दुजाभाव करून विरोधी नगरसेवकांच्या निधीला कात्री लावायची, या कर्तव्यालाच अधिकारी अधिक महत्त्व देत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यात असमन्वय आहेच. 'मूठभरांच्या हाती आणि धटाई खाई मिठाई'प्रमाणे सर्वकाही सुरू असल्याने ही जीवघेणी स्थिती आली आहे. सततचे अपघात, बळींची वाढती संख्या, पाणी, ड्रेनेज यासह मूलभूत सुविधांची होणारी गैरसोय यामुळे जनतेत संताप आहे. सत्ताधार्‍यांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यातही संताप आहे.

शिवसेना नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी दोनवेळा महापालिकेत या प्रश्नांवर आक्रमक आंदोलन केले. मनसेने शुक्रवारी तीच भूमिका घेतली. महासभेत रान उठविले, पण सत्ताधार्‍यांच्या पाठबळामुळे प्रशासनावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. जनतेच्या असंतोषाची वाट पाहू नका, असे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट गिरीश महाजन यांना सुनावले. आठ दिवसात नाशिकचे सर्व खड्डे बुजविले जातील, मी स्वत: यात लक्ष देईल, असे सांगण्याची उपरती महाजनांना झाली. पस्तीस-चाळीस हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत, चार-सहा महिने त्रास होणारच, असे मी वारंवार सांगितले आहे, हा उद्दामपणा त्यांनी दाखविलाच. यापूर्वी इतकी कामे कधी झाली होती का, असा प्रश्न उपस्थित करून नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकू. सहा महिन्याने नाशिकमध्ये येणार्‍याला आपण कुठे आलो असे वाटेल, हे सांगून नाशिक स्वर्गसे सुंदर होणार, हा त्यांचा दावा फोल आहे. मुळात नाशिक शहर हा अतिदुर्गम भाग नाही की त्याच्या विकासाचे काम त्यांनी आताच हाती घेतलेय, असेही नाही. त्यांच्याआधी अनेक वर्षांपासून शहराचा विकास सुरूच आहे. यापूर्वीचा कुंभमेळा आणि त्यानंतरचा मधला काही काळ सोडला तर महाजन हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, महापालिकेतही त्यांचीच सत्ता होती, तेव्हा ते निष्क्रिय होते का, हा प्रश्न उपस्थित होतो. मुळात सध्यासारखी दुर्दशा कधी झाली नव्हती हेच अंतिम सत्य आहे. जनतेने विश्वासाने भाजपाला सत्तेचे महाद्वार खुले करून दिले, असे ते अनेकदा म्हणतात. भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारामुळे बिघडलेले हे महाद्वार त्याच जनतेसाठी स्वर्गाचे दार ठरत आहे, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले असावे. किडेमकोड्यांगत, झुरळांप्रमाणे माणसांचा बळी घेणारी ही वैकुंठ एक्स्प्रेस थांबवा, अन्यथा असंतोषाचे आग्यामोहळ सत्ताधार्‍यांवर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या असंतोषाची वाट पाहू नका, हे मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा अधोरेखित केले आहेच.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana