बिहारच्या सीवान जिल्ह्यातील जामो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमापूर गावात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. घरामध्ये साठवलेल्या फटाक्यांना आग लागल्याने तब्बल दोन तास भयानक धमाके झाले.
या स्फोटामुळे घराचा पुढचा भाग रस्त्यावर कोसळला तर चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
सीवानचे पोलीस अधीक्षक (एसपी) भारत सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी घरामध्ये एकूण सात जण उपस्थित होते. मो. अमिउद्दीन मिया यांच्या या घरामधील साठवलेल्या फटाक्यांना आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक सलग तब्बल दोन तास धमाके होत राहिले. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय टीमसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
सातपैकी चार जणांचा मृत्यू झाला असून इतरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता असून, या प्रकरणी एफआयआर नोंदवून संबंधितांकडे परवाना होता की नाही आणि प्रशासकीय पातळीवर परवान्यांच्या पडताळणीत काही त्रुटी राहिल्या का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे भारत सोनी यांनी स्पष्ट केले.

