Sunday, 20 Sep, 7.00 am सामना

ठळक बातम्या
बॉलीवूडमधील बड्या धेंडांची 'नशा' उतरणार, ड्रग्ज तस्कर राहिलच्या चौकशीतून अनेक नावांचा उलगडा

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूडमधील बड्या धेंडांची 'नशा' उतरणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) नुकतीच अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर राहिल विश्रामच्या चौकशीतून बॉलीवूडमधील अनेक नावांचा उलगडा झाला आहे. एनसीबी या कलाकारांच्या नावांची योग्य पडताळणी करून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहे.

ड्रग्जच्या दुनियेत राहिल याला 'सॅम अंकल' नावाने ओळखले जाते. तो बॉलीवूडमधील 'बॉस'साठी काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याच 'बॉस'च्या सांगण्यावरून राहील बॉलीवूडच्या सेलिब्रिटींना 'मलाना क्रीम' नावाच्या महागड्या ड्रग्जचा पुरवठा करायचा. त्यामुळे ड्रग्ज कनेक्शनमधील 'बॉस'चा बुरखा फाडण्यात एनसीबीला यश आले की त्याच्या चौकशीतील माहितीच्या आधारे अनेक नशेखोर सेलिब्रिटींच्या मुसक्या आवळता येणार आहेत. एनसीबीचे पथक राहिलच्या मोबाईलच्या माध्यमातून 'बॉस'चा थांगपत्ता लाकेल, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱयांनी व्यक्त केली.

राहिल विश्राम याला न्यायालयाने सोमवारपर्यंत एनसीबी कोठडी सुनावलेली आहे. त्याच्या चौकशीतून बॉलीवूडमधील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा उलगडा होऊ लागला आहे. त्यामुळे त्या नशेखोर सेलिब्रिटी आणि माफियांपर्यंत पोहोचण्यासाठी एनसीबीला राहिल आणखी काही दिवस आपल्या कोठडीत हवा आहे. त्याच अनुषंगाने राहिलची कोठडी वाढवून देण्यासाठी एनसीबीकडून न्यायालयाला विनंती केली जाणार आहे.

आणखी एका आरोपीला अटक

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ड्रग्ज प्रकरणात शनिवारी आणखी एका आरोपीला अटक केली. किशोर अमन ऊर्फ किशोर शेट्टी असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर ड्रग्जची खरेदी आणि साठा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.

एनसीबीच्या चार जणांना कोरोनाची लागण

नार्केटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटमधील चार कर्मचारी आणि ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. अटक आरोपीला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले आहे. नुकतेच सुशांत सिंग आत्महत्याप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीमधील एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच एनसीबी मुंबई युनिटमधील चार कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई युनिटमधील एका कर्मचाऱयाला ताप येऊ लागल्याने त्याची चाचणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. खबरदारीचा उपाय म्हणून काही कर्मचाऱयांची कोरोना चाचणी केली. त्यात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. काहींमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली नाहीत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते तपास पथकातील नसल्याचे एनसीबीच्या एका करिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. कोरोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱयांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top