Thursday, 14 Jan, 8.34 am सामना

ठळक
ब्रिस्बेन कसोटीसाठी अनफिट टीम इंडिया!, अंतिम अकराची निवड करताना लागणार कस

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे चौथ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटीआधी हिंदुस्थानी संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कसोटीसाठी अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना संघ व्यवस्थापनाचा कस लागेल हे निश्चित. याप्रसंगी टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळू शकते यावर दैनिक 'सामना'ने टाकलेला हा प्रकाशझोत.

हे खेळाडू निश्चित खेळणार

कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज या खेळाडूंचे ब्रिस्बेन कसोटीतील अंतिम अकरामधील स्थान पक्के आहे.

तीन की चार वेगवान गोलंदाजांना संधी ?

ब्रिस्बेन येथील गॅबाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना पोषक असते. त्यामुळे कमीत कमी तीन वेगवान गोलंदाज अंतिम अकरामध्ये असतील यात शंका नाही. पण अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जर दुखापतीमुळे आगामी कसोटीत खेळू शकला नाही तर चार वेगवान गोलंदाजांनी संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व टी. नटराजन या चौघांचाही अंतिम अकरामध्ये समावेश होऊ ंशकतो. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे. त्यामुळे रविचंद्रन अश्विन जरी फिट झाला तर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोघेही ऑफस्पिनर असले तरी दोघांची शैली भिन्न आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्याचा फायदाच होणार आहे. असे झाल्यास नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांच्यापैकी एकालाच अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येईल.

फलंदाजी विभागातही बदल

टीम इंडियाचे बहुतांशी फलंदाज फिट आहेत. त्यामुळे या विभागात जास्त बदल होणार नाहीत. हनुमा विहारी दुखापतीमुळे बाहेर गेलाय आणि रिषभ पंतही दुखापतीमधून पूर्णपणे फिट झाला की नाही याबाबत निश्चित काही सांगण्यात आलेले नाही. हिंदुस्थानी संघाने सात फलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यास रिषभ पंतला पाचव्या, मयांक अग्रवाल किंवा पृथ्वी शॉला सहाव्या आणि रिद्धीमान साहाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात येऊ शकते. अर्थात यासाठी रिषभ पंत व मयांक अग्रवाल हे दोघेही फिट असायला हवेत. हिंदुस्थानी संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरल्यास रिषभ पंतला फलंदाज म्हणून आणि रिद्धीमान साहाला यष्टिरक्षक म्हणून अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येऊ शकते. किंवा रिषभ पंत आणि मयांक अग्रवाल/पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाला चान्स देण्यात येऊ शकतो.

ब्रिस्बेन कसोटीसाठी

टीम इंडियाचा संभाव्य संघ

सलामीवीर ः रोहित शर्मा, शुभमन गिल

तिसरा क्रमांक ः चेतेश्वर पुजारा

चौथा क्रमांक ः अजिंक्य रहाणे

पाचवा क्रमांक ः रिषभ पंत

सहावा क्रमांक ः मयांक अग्रवाल/पृथ्वी शॉ/रिद्धीमान साहा

सातवा क्रमांक ः रवी अश्विन/वॉशिंग्टन सुंदर

आठ , नऊ , दहा , अकरा क्रमांक ः शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी. नटराजन

(टीप - रवी अश्विन बाहेर गेल्यास चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागणार)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top