Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Buldhana news - नांदुरा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पिंपळखुटा धांडे जलमय

Buldhana news - नांदुरा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पिंपळखुटा धांडे जलमय

सामना 1 week ago

गेल्या दोन दिवसांपासून नांदुरा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

पूर्णा आणि ज्ञानगंगा नदीच्या मधोमध वसलेल्या रोटी गावाला जोडणाऱ्या ज्ञानगंगा नदीवरील एकमेव पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, आजारी रुग्णांना उपचारासाठी शहरात आणणेही अशक्य झाले आहे. यापूर्वी सन 2006 मध्येही या गावाला अशाच भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

विशेष म्हणजे, रोटी हे गाव जिगाव सिंचन प्रकल्पातील बाधित गाव आहे. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप या गावाचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव मुठीत धरून राहावे लागत असून, शासनाच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ईसापूर गावाचा संपर्क तुटला आहे, तर आंबोळा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे.

दुसरीकडे, पिंपळखुटा धांडे येथे अतिवृष्टीमुळे पूर्ण गाव जलमय झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रस्त्यांवर कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याशिवाय, निमगाव फाटा ते निमगाव हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

तालुक्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना धोकादायक पुलांवर अथवा नदीकाठच्या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बाधित गावांमध्ये प्रशासनाने तातडीने मदत पोहोचवून नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana