Saturday, 19 Oct, 7.40 am सामना

मुंबई
चला आणूया मजबूत सरकार. काम करणारं सरकार! उद्धव ठाकरे यांचे आवाहनराजकीय विरोधकांची आता फिकीर नाही. कारण सर्वत्र भगवे वातावरण आहे आणि ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. गेली 50-60 वर्षे उरावर घेतलेले काँगेस-राष्ट्रवादीचे धोंडे ते फेकून देणार आहेत आणि छत्रपती शिवरायांचा भगवाच आता हाती घेऊ, असा जनतेनेच निर्धार केला असून महायुतीचे मजबूत आणि काम करणारे सरकार आणूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

बीकेसी मैदानातील भगव्या जनसागराला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी काँगेस-राष्ट्रवादीची खास ठाकरी शैलीत सालटी तर काढलीच, पण विजयाचा निर्धारही केला. लोकसभा निवडणूक प्रचारा वेळीही महायुतीची याच मैदानात विराट सभा झाली होती. ती आठवण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, तेव्हाही असाच समोर समुद्र पसरला होता. मुंबईकर नेहमीच खरे बोलतात आणि खरे तेच बोलतात. तेव्हाही ते महायुतीला बहुमत देणार का, या प्रश्नावर 'हो' म्हणाले होते आणि आता तर त्यांनी दुप्पट आवाजात 'होकार' दिला आहे. त्यामुळे महायुतीचा विजय पक्का आहेच. कारण सर्वत्र दिसते आहे ते भगवे वातावरण आणि महायुती आणि फक्त महायुती!!

विरोधक शिल्लक नाही
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, समोर विरोधक कुणीही नाही. काँगेसचा ना झेंडा उरला, ना बुडखा उरला. काहीच शिल्लक राहिलेले नाही. राष्ट्रवादीची तशीच अवस्था आहे. निवडणुकीनंतर कदाचित राष्ट्रवादीतील उरलेले नेतेही आमच्याकडे रांग लावतील, अशी स्थिती आहे. काँगेस नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले, आता आम्ही थकलोय. खरे आहे त्यांचे म्हणणे. गेली 50-60 वर्षे खाऊन खाऊन काँगेस-राष्ट्रवादीवाले थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हातात देश आणि राज्याची सत्ता आली आहे हे त्यांना कळून चुकले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा एकच कडकडाट झाला.

ही वेळ का आली?
काँगेस-राष्ट्रवादीवर ही वेळ का आली याचा त्यांनी विचार करावा असे सांगून उद्धव ठाकरे यांनी काँगेसच्या सत्तालोलूप वृत्तीवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, पूर्वी काँगेसमध्ये मोठे नेते होते. त्यांच्याकडे पाहताना आदराने मान खाली जात असे. मात्र आताची काँगेसमध्ये जी पिल्लावळ आली आहे, त्यांच्याकडे पाहताना शरमेने मान खाली जाते. तेव्हाची काँगेसची पिढी ही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणारी होती. पण नंतर विचार गेला आणि विकार आला. सत्तेसाठी लढणारी माणसे आली. एखाद्या नरभक्षक वाघासारखे सत्ताभक्षक आले, म्हणून काँगेसची ही अवस्था झाल्याचे टीकास्त्र्ा उद्धव ठाकरे यांनी सोडले.

मोदींनी खंबीरपणे देश पुढे नेला
उद्धव ठाकरे यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, पंतप्रधान गेल्या 5 वर्षांपासून ज्या खंबीरपणे देश पुढे नेत आहेत ते कौतुकास्पद आहे. राज्यातही गेल्या पाच वर्षांत युती सरकारने धडाकेबाज कामगिरी केली आहे. मात्र सरकारने जी काही विकासकामे केली त्यात शिवसेनेचाही सिंहाचा वाटा आहे, हे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्ष एक मजबूत सरकार आणि काम करणारे सरकार देऊ शकतात हे सिद्ध झाले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महिन्यात दोन दिवाळी
एका महिन्यात दोन विजयादशमी आहेत, पहिली 8 ऑक्टोबरला साजरी झाली, दुसरी 24 तारखेला निवडणुकीच्या निकालादिवशी साजरी होईल. एवढेच नव्हे तर या महिन्यात दोन दिवाळी आहेत. दुसरी दिवाळी अयोध्येची… राममंदिराची, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच जनसमुदायातून 'जय श्रीराम'चा नारा घुमला.

…तर वीर जवाहरलाल म्हणेन
लोकसभेच्या निवडणुकीवेळी राहुल गांधी प्रचाराला आले होते तेव्हा त्यांनी सावरकरांची पळपुटा म्हणून निर्भर्त्सना केली होती. त्याचा शेलक्या शब्दांत समाचार घेताना उद्धव ठाकरे गरजले, सावरकर 14 वर्षे तुरुंगात होते. जवाहरलाल नेहरू 14 मिनिटे तरी तुरुंगात होते का? असतील तर राहुल गांधींनी सांगावे. मी नेहरूंना वीर जवाहरलाल बोलायला तयार आहे. सावरकरांना पळपुटा बोलणारे राहुल गांधी खरे पळपुटे आहेत. लोकसभेत काँग्रेस हरली तेव्हा राहुल पक्षाचे नेतृत्व सोडून पळाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काँगेसची पिसे काढली.

सावरकरांच्या 'भारतरत्न'साठी पंतप्रधानांकडे हट्ट धरा
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा जोतिबा फुले यांना 'भारतरत्न' देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. तो योग्यच असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, सावकरांची क्रांती ही विचारांची होती, तर महात्मा फुले हेसुद्धा वैचारिक क्रांतिकारक होते. महाराष्ट्रातील अशा क्रांतिवीरांची, किंबहुना महाराष्ट्राची ओळख काय हे अवघ्या जगाला कळण्यासाठी त्यांना 'भारतरत्न' मिळायलाच हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ संकल्प करू नये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यासाठी हट्ट धरावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top