Monday, 28 Sep, 7.00 am सामना

देश
चारो दिशाओंमें तेज सा वो छाया. उसकी भुजाए बदले कथाए, चीन सीमेवर हिंदुस्थानचे बाहुबली रणगाडे तैनात!

जगातील सर्वात उंच युद्धभूमी लडाखमध्ये गेले पाच महिने चीनच्या कुरापतींमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. रक्त गोठवणाऱ्य़ा थंडीत समुद्रसपाटीपासून 14,500 फूट उंचीवरील लडाखच्या चुमार-डेमचोक भागात सीमांच्या रक्षणाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी हिंदुस्थानी जवान आता सज्ज झाले आहेत. जवानांच्या साथीला आता टी -90 आणि टी -72 हे हलके पण शत्रूला धोकादायक ठरणारे रणगाडे असणार आहेत. शिवाय या सशस्त्र दलांच्या दिमतीला बीएमपी -2 कॉम्बॅट वाहनेही देण्यात आली आहेत.

थंडीच्या हंगामात लडाखचे तापमान उणे 35 डिग्री सेल्सिअस इतके खाली जाते. या वातावरणात शस्त्रे आणि लष्कराची वाहनेही काम करू शकत नाहीत. पण हायटेक टी -90 आणि टी-72 रणगाडे या भीषण थंडीतही शत्रूंवर तोफगोळे डागण्याचे काम लीलया करू शकतात. हे रणगाडे उणे 40 अंश तापमानातही आपले काम सुलभरीत्या करण्यात सक्षम आहेत, अशी माहिती मेजर जनरल अरविंद कपूर यांनी दिली. थंडीच्या मोसमात लडाख सीमेवर रक्त गोठवणारे थंड वारे वाहतात. शिवाय बर्फाची वादळेही उद्भवतात. या परिस्थितीत रणगाडे, बंदुका आणि अन्य शस्त्रे चालवणे जिकिरीचे काम असते. पण हिंदुस्थानची 'फायर अ‍ॅण्ड फ्यूरी कॉर्पस' ही लढाऊ तुकडी बर्फाळ वातावरणात युद्ध करण्यात वाकबगार आहे.अशा प्रकारचे कठीणात कठीण युद्ध करू शकणारी ही जगातील पहिलीच युद्ध तुकडी असल्याचे मेजर जनरल कपूर यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.

संभाव्य युद्धासाठी हिंदुस्थान सज्ज

लडाखमधील टी-90 आणि टी-72 या आधुनिक हलक्या रणगाड्यांमुळे हिंदुस्थानी लष्कर सीमेवर अधिक बळकट झाले आहे. थंडीच्या हंगामात सैन्याला थंडीसाठीचे कपडे, शरीराला सकस शक्ती पुरवू शकणारे रेशन, रणगाडे आणि कॉम्बॅट वाहनांसाठी इंधन तेल, वातावरण गरम करणारी उपकरणे याचा पर्याप्त साठा लडाख सीमेवरील हिंदुस्थानी जवानांसाठी करण्यात आला आहे. शिवाय मिसाईल्स आणि शस्त्रांचा साठा आणि ती युद्धस्थळी वाहून नेण्याची यंत्रणा लष्कराने सज्ज ठेवली आहे. चीनने 29 आणि 30 ऑगस्टला आपले छोटे रणगाडे लडाख सीमेवर आणले होते. पण त्यांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानचे टी-90 आणि टी -72 रणगाडे समर्थ आहेत असा विश्वासही मेजर जनरल कपूर यांनी व्यक्त केला. हिंदुस्थानी जवानांनी चीनचा लडाखमधील घुसखोरीचा प्रयत्न मोडीत काढताना पेंगाँग सरोवरानजीकच्या उंच टेकड्यांवरही ताबा मिळवला आहे. त्यामुळे आमच्याशी युद्ध करताना चिनी सैन्याला दहा वेळा विचार करावा लागेल, असेही कपूर म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top