छत्तीसगडमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेचा फटका आता वन्यजीवांनाही बसू लागला आहे. कोरबा जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीजवळील नौकोनिया तलाव परिसरात शेकडो वटवाघळे झाडांवर मृतावस्थेत लटकलेली आढळून आली, तर अनेक वटवाघळांचे मृतदेह झाडांखाली पडलेले दिसून आले.
राज्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने आणि अतिनील (यूव्ही) किरणोत्सर्ग अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
हिंदुस्थान हवामान विभागाने (IMD) राज्यातील २० जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला असून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
तलाव परिसरात भीषण दृश्य
पाली येथील नौकोनिया तलाव परिसरातील उंच झाडांवर हजारो स्थलांतरित वटवाघळांनी हंगामी निवारा केला होता. स्थानिकांनी झाडांच्या फांद्यांवर लटकलेली वटवाघळे पूर्णपणे निश्चल झाल्याचे पाहिले. दिवसभर झाडांवरून मृत वटवाघळे खाली पडत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कटघोरा विभागाचे वनाधिकारी कुमार निशांत यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे २०० वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून प्राथमिक तपासात उष्माघातामुळे हा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
नमुने तपासणीसाठी पाठवले
मृत वटवाघळांचे नमुने पशुवैद्यकीय पथकाने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. मृत्यूचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक निरीक्षणानुसार तीव्र उष्णतेचा सामना न करू शकल्याने वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी येणाऱ्या वटवाघळांवर संकट
स्थानिकांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये ही वटवाघळे दरवर्षी तलाव परिसरात येतात. यंदा त्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक होती. तलावालगतच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात वटवाघळांचे थवे दिसत असल्याने हा परिसर स्थानिक आकर्षण बनला होता. मात्र गेल्या काही दिवसांतील असह्य उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
एका ग्रामस्थाने सांगितले, "वटवाघळे पिकलेल्या फळांप्रमाणे झाडांवरून खाली पडत होते". आसपासच्या काही गावांतील तलाव परिसरातही अशाच घटना घडल्याचे वृत्त आहे.
४२ अंशांपुढील तापमान ठरते घातक
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, वटवाघळांच्या शरीराचे सामान्य तापमान सुमारे ३८ अंश सेल्सिअस असते. वातावरणातील तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्यानंतर त्यांना तीव्र त्रास होऊ लागतो. तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते. उष्माघातामुळे शरीरातील पाण्याची कमतरता, शारीरिक संतुलन बिघडणे आणि अखेरीस मृत्यू होऊ शकतो.
शेती आणि आरोग्यावरही परिणाम
कोरबा आणि आसपासच्या भागात शनिवारी तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवण्यात आले. राज्यातील उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे केवळ वन्यजीवच नव्हे, तर शेती आणि मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. उष्णतेचा हा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

