Dailyhunt
दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करा, अरविंद सावंतांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करा, अरविंद सावंतांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

सामना 1 week ago

कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून वारंवार होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांबाबत कोकणवासीयांना मिळणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या सविस्तर पत्रात अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेचा दुजाभाव आकडेवारीसह मांडला आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की,

कोकणच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या: मध्य रेल्वेने १९ मार्गांवरून सुमारे १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये बिहारसाठी ४५० आणि उत्तर प्रदेशसाठी ३३२ गाड्या सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो चाकरमानी प्रवास करत असलेल्या कोकण मार्गावर (मडगाव व्हाया कोकण) केवळ ३६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत, जो मोठा अन्याय आहे.

फेऱ्यांमधील मोठा विरोधाभास: ‘सीएसएमटी-गोरखपूर’ विशेष गाडी एप्रिल महिन्यात दररोज धावणार आहे, तर ‘सीएसएमटी-मडगाव’ ही गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान केवळ आठवड्यातून एकदा (गुरुवारी) धावणार आहे. हा विरोधाभास अत्यंत संतापजनक असल्याचे सावंतांनी म्हटले आहे.

नियमित गाड्या हाऊसफुल्ल: मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस यांसारख्या नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची ‘वेटिंग लिस्ट’ १०० च्या पुढे गेली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.

जनआंदोलनाचा इशारा

सध्या कोकणातील रस्ते आणि घाटांमधील अवघड मार्ग तसेच वाहतूक कोंडीमुळे रस्ते प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. अशा स्थितीत रेल्वेने कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. “मध्य रेल्वेच्या या धोरणामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप असून, हा अन्याय तातडीने दूर न केल्यास जनतेचा उद्रेक होईल आणि आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल,” असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे.

प्रमुख मागण्या

१. मध्य रेल्वेला तातडीने निर्देश देऊन कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवून त्या ‘दररोज’ कराव्यात आणि कोकणवासीयांना दिली जाणारी सापत्न वागणूक बंद करावी.
२. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेक्स (Rakes/डबे) उपलब्ध करून द्यावेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana