मुंबई
दहावी, बारावी परीक्षा घेण्यास परवानगी

मुंबई महापालिका क्षेत्रातील दहावी, बारावीच्या शाळांना परीक्षा घेण्यास मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. तसेच केंब्रिज बोर्डाच्या नववी ते बारावीच्या 23 जानेवारीपासून सुरू होणाऱया परीक्षा घेण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंब्रिज बोर्डाच्या नववी ते बारावीचे काही विषय हे फेब्रुवारी व मार्च या सत्रातील असून या बोर्डाची परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या परीक्षा घेण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांबरोबच सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई बोर्डांशी संलग्नित असलेल्या मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळांना दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यास महापालिका शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. शाळांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊनच तसेच आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक निकषांचे पालन करूनच परीक्षांचे आयोजन करावे, अशा सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी केल्या आहेत.