Dailyhunt
दक्षिणेत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची हवा; वेगवेगळ्या पक्षातून बायको, मुलगा आणि जावई झाले आमदार

दक्षिणेत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची हवा; वेगवेगळ्या पक्षातून बायको, मुलगा आणि जावई झाले आमदार

सामना 5 days ago

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सोमवारी 4 मे रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमधील विजयी उमेदवारांची देशभरात चर्चा होत असताना हिंदुस्थानचे 'लॉटरी किंग' म्हणून ओळखले जाणारे सँटियागो मार्टिन हे देखिल चर्चेत आहेत.

सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे राजकीय वर्तुळात मार्टिन कुटुंबाच्या वाढत्या प्रभावाची चर्चा रंगली आहे.

दरम्यान या निवडणुकांमध्ये या तिन्ही विजयी उमेदवारांपैकी सर्वात महत्त्वाची कामगिरी आधव अर्जुन रेड्डी यांनी केली आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. आधव अर्जुन यांनी विल्लीवाक्कम मतदारसंघातून निवडणूक लढवली असून 17,302 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. अर्जुन हे सँटियागो मार्टिन यांची मुलगी डेझी मार्टिन यांचे पती आहेत.

अर्जुन यांच्याव्यतिरिक्त सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लीमा रोज मार्टिन यांनीही तमिळनाडूतील लालगुडी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. लीमा यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) कडून निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला. या मतदारसंघातून लढताना त्यांच्यासमोर डीएमके आणि टीव्हीके पक्षातील उमेदवार होते. मात्र त्यांनी सुमारे 2500 मतांच्या फरकाने विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

पुद्दुचेरीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटक असलेल्या ‘लॅचिया जननायक कच्ची’ या पक्षाने दोन जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी एका जागेवर त्यांनी विजय मिळवला. सँटियागो मार्टिन यांचे चिरंजीव आणि उद्योजक जोस चार्ल्स मार्टिन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी कामराज नगर विधानसभा मतदारसंघातून 10,205 मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. त्यामुळे सँटियागो मार्टिन यांच्या कुटुंबातील विजयी उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana