Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दमदार पावसाने यवतमाळला दिलासा; निळोणा धरण ओव्हरफ्लो

दमदार पावसाने यवतमाळला दिलासा; निळोणा धरण ओव्हरफ्लो

सामना 3 weeks ago

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

वतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत केले असले, तरी नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

या पावसामुळे शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले असून, यवतमाळकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तूर्तास मिटली आहे.

सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. आधीच खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या रस्त्यांमध्ये पाणी भरल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला, तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

दुसरीकडे, या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

काल काळे नभ दाटून आल्याने भरदिवसाही संध्याकाळ झाल्याचा भास होत होता. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर चिमुकल्यांनी पावसात भिजत मनमुराद आनंद लुटला.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे यवतमाळ शहराची ‘वॉटर बँक’ म्हणून ओळख असलेले निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तथापि, हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana