पश्चिम बंगालमधील संपूर्ण निवडणूक केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. 'ज्यांनी देशाचे रक्षण करायला हवे ती सीआरपीएफ एका पक्षाचे रक्षण करत आहे.
लोकशाहीचे अक्षरशः बारा वाजवून टाकलेत. माझ्या आयुष्यात अशी लोकशाही कधी पाहिली नाही,' असा तीव्र संताप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज व्यक्त केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 90 टक्क्यांहून जास्त मतदान झाले. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथे स्वतःच्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. 'निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो, पण भाजपनं हा उत्सव उद्ध्वस्त करून टाकला आहे. बंगालमधील एकाही निवडणूक बूथवर राज्याचे पोलीस नाहीत. सर्व बूथ केंद्राने पाठवलेल्या सीआरपीएफने ताब्यात घेतले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार केले जात आहेत. अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री आमच्या एका कार्यकर्त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. ही कसली गुंडगिरी आहे,' असा सवाल त्यांनी केला.
एनआयएचे अधिकारीही बंगालच्या रस्त्यावर
केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दलांबरोबरच राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी (एनआयए) देखील बंगालच्या रस्त्यावर उतरवले आहेत. त्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यूपीए सरकारने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी 'एनआयए'ची स्थापना केली होती. भाजप या संस्थेला निवडणुकांसाठी वापरत आहे, अशी खोचक टीका काँग्रेसने केली, तर बंगालमध्ये आता फक्त राफेल आणि युद्धनौका उतरवणेच बाकी आहे, असा संताप तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केला.
मरू, पणहटणारनाही!
'1984 पासून मी निवडणूक लढतेय, पण आता जे अन्याय-अत्याचार होतायत तसे कधीच झाले नाहीत. मतदान शांततेत व्हायला हवे, पण भाजपला बळाचा वापर करून निवडणुकीत गैरप्रकार घडवून आणायचा आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. आमचे कार्यकर्ते आणि बंगालची जनता प्राणांची आहुती देतील; पण हटणार नाहीत. बूथ सोडणार नाहीत,' असे ममतांनी ठणकावले. तृणमूल काँग्रेस जिंकणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

