टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
हा हल्ला म्हणजे आपल्या देशातील लोकशाही जवळपास संपुष्टात आल्याचा जगाला मिळालेला एक संकेत असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट करत देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला, हा आपल्या देशातील लोकशाही जवळपास संपुष्टात आल्याचा जगाला मिळालेला एक संकेत आहे. कायदा आणि सुव्यवस्था एकतर जाणीवपूर्वक नियंत्रणात ठेवली जात नाहीये, किंवा ती आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे.”
देशात जर खासदारांच्याच सुरक्षेची शाश्वती देता येत नसेल, तर या ढासळत्या परिस्थितीकडे संपूर्ण जग कोणत्या दृष्टीने बघेल, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या असुरक्षित वातावरणामुळे देशात येणारे परदेशी गुंतवणूकदार आणि पर्यटक यांच्यावर काय परिणाम होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या एकेकाळच्या प्रगल्भ आणि मजबूत लोकशाही व्यवस्थेसाठी ही घटना अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

