Saturday, 07 Mar, 7.51 pm सामना

ठळक बातम्या
दिल्लीतील दंगलीमागे भाजप-आरएसएसचा हात, आंबेडकरांचा गंभीर आरोप

दिल्लीतील दंगलीमागे भाजप आणि आरएसएसचा हात आहे. ही दंगल पूर्वनियोजित होती आणि या दंगलीपूर्वी 25 लाख सैनिकांचे बोगस गणवेश विक्री झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. नाभिक समाजाच्या अधिवेशनासाठी ऍड.आंबेडकर पंढरीत आले असता विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, बळीराजा शेतकरी संघटनेचे माउली हळणवर आदी उपस्थित होते.

ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर या कायद्याला कडाडून विरोध केला. दिल्ली येथील शाहीनबाग मध्ये शांततेत आंदोलन सुरू होते. यामुळे दंगल होण्याचा प्रश्‍नच नव्हता. दिल्ली येथील दंगल अचानक सुरू होवून अचानक बंद कशी झाली असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ही दंगल ठरवून घडवून आणली असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका असा इशाराच त्यांनी दिला. शाहीनबाग प्रमाणे देशभरात साडेतीन हजार ठिकाणी अशी आंदोलन सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

सीएए, एनआरसी या कायद्याची गरज काय असा प्रश्‍न ऍड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. देशाची लोकसंख्या 130 कोटी असून यामध्ये असे किती लोक बाहेरचे असू शकतात. बांगलादेशातून 1971 साली आलेली पिढी आता हयात नाही. मग हा अट्टहास का? सध्या जन्मदाखले बंधनकार आहेत. पूर्वी हा कायदा नसल्याने अनेकांच्या आई-वडिलांचे दाखले नाहीत मग अशा सर्वांना तुम्ही देशा बाहेर काढणार का? आसाममध्ये 20 लाख हिंदुकडे नागरिकत्वाचे पुरावे नाहीत त्यांना बाहेर काढणार का? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

खासदार पाच वर्षे काढतील
सोलापूरचे खासदार जयसिध्देश्‍वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले असल्याबाबत ऍड.आंबेडकर यांना विचारले असता, त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे न्यायालयाच्या मदतीने ते पुढील पाच वर्षे काढतील असे हसून सांगत येथे पुन्हा निवडणुकीस उभारण्याची आपली तयारी नसल्याचे स्पष्ठ केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top