मुंबईतही बिबटय़ांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दिंडोशीमधील रहेजा हाईट्स या सोसायटीत रात्री अपरात्री बिबटय़ाचा वावर आढळल्याने एकच खळबळ उडाली. बिबटय़ांचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांचा अधिवास असला तरी त्यांचा उपद्रव अलीकडे थांबला होता. परंतु आता पुन्हा एकदा दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील रहेजा हाईट्स सोसायटीमध्ये बिबटय़ाचा संचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या सोसायटीच्या सीसीटीव्हीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आलेला बिबटय़ा रात्री-अपरात्री सोसायटीच्या आवारात मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळाला आहे. यासंदर्भात शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी परिसराची पाहणी करून रहिवाशी, वन विभाग अधिकाऱ्यांसोबत उपाययोजनेबाबत चर्चा केली.
नगरसेवक तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव, रेंज फॉरेस्ट ऑफिसर योगेश महाजन, डॉ. निखिल बनगर, रहेजा हाईट्स सोसायटीमधील सिक्युरिटी कमिटी मेंबर डॉ. पूजा कारंडे, नरेश बुधिया, कॅप्टन सौरव तिवारी, जयंत शेट्टी, तुषार नायरी उपस्थित होते.
पिंजरे, ट्रकिंगकॅमेरेबसवल्याचावनविभागाचादावा
n मुंबईत बिबटय़ाचे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी याआधीदेखील वन मंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले होते. आधी या भागात संरक्षक जाळ्या बसवल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून हा बिबटय़ा सोसायटीमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
n बिबटय़ाचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार सुनील प्रभू यांनी वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. या परिसरात पिंजरे आणि ट्रकिंग कॅमेरादेखील बसवण्यात आल्याची माहिती वन विभाग कर्मचाऱ्यांनी या वेळी दिली. तसेच बिबटय़ांना रोखण्यासाठी संरक्षक जाळ्या आणि कुंपण उभारण्यासह इतर उपाय केल्याची माहितीदेखील वन विभागाने दिली.

