Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दोन लाखांत मिळाला जिल्हा बँकेचा ठराव!  ठरावासाठी लिलावाची बोली; कोडोली विकास सोसायटीचा अनोखा पायंडा

दोन लाखांत मिळाला जिल्हा बँकेचा ठराव! ठरावासाठी लिलावाची बोली; कोडोली विकास सोसायटीचा अनोखा पायंडा

सामना 2 days ago

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव देण्यावरून जिह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच, कराड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीने ठराव प्रक्रियेसाठी अनोखा मार्ग अवलंबला.

वाद-विवाद आणि संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी सोसायटीला भरीव आर्थिक मदत करणाऱया सभासदाला ठराव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत थेट लिलावाची बोली घेण्यात आली. या बोलीत सभासद विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी दोन लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत ठरावावर बहुमताने बाजी मारली.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानासाठी ठराव घेण्यासंदर्भात सोसायटीला बँकेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाची बैठक झाली. सोसायटीच्या विकासासाठी राजकीय स्वहित बाजूला ठेवून भरीव आर्थिक मदत करणाऱया सभासदाला ठराव देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार सर्व सभासदांना आवाहन करून आर्थिक मदतीची बोली लावण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

सोसायटीच्या सभागृहात सोमवारी (दि. 3) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एक लाख रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली. विक्रमसिंह जगताप आणि आनंदराव तुकाराम जगताप यांनी बोलीत सहभाग घेतल्याने काही काळ चुरस निर्माण झाली. बोलीची रक्कम वाढत गेल्यानंतर अखेर विक्रमसिंह जगताप यांनी दोन लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावत ठराव मिळविला.

बोली जिंकल्यानंतर जगताप यांनी, दोन लाख रुपयांचा धनादेश तत्काळ सोसायटीकडे सुपूर्द केला. त्यानंतर संचालक मंडळाच्या वतीने विक्रमसिंह जगताप तसेच आनंदराव जगताप यांचे आभार मानण्यात आले. विक्रमसिंह जगताप यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. बैठकीत सोसायटीच्या विकासासाठी सभासदांनी राजकीय हितापेक्षा संस्थेच्या हिताला प्राधान्य द्यावे, असा सूर व्यक्त करण्यात आला. अभिजित जगताप यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana