पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ आसाम आणि पुद्दुचेरी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीतून मतदारांनी दिलेला कल पाहता तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.
निकालांनंतर होणाऱ्या संभाव्य फोडाफोडीच्या राजकारणाचा धोका ओळखून टीव्हीके पक्षाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. कल जाहीर होताच पक्षाने आपल्या सर्व विजयी उमेदवारांना चेन्नईतील पनयूर येथील मुख्यालयात हजर राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तास्थापनेसाठी संख्याबळ कमी पडल्यास आमदारांची पळवापळवी होण्याची भीती टीव्हीकेला वाटत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून विजयी आमदारांना एखाद्या सुरक्षित स्थळी किंवा रिसॉर्टवर हलवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज पडताळणी प्रक्रियेदरम्यान एडप्पाडी येथील टीव्हीकेचा एक उमेदवार काही काळ बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पक्षाची चिंता अधिक वाढली असून, दबावतंत्रापासून सावध राहण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत.
दरम्यान याआधी विविध एक्झिट पोलच्या आकड्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘टुडेज चाणक्य’च्या अंदाजानुसार विजय यांच्या पक्षाला सुमारे चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे डीएमके आणि एआयएडीएमके दोन्ही पक्षांचे धाबे दणाणले आहे.
दुसरीकडे, ‘ॲक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज टीव्हीकेसाठी महत्त्वाचा ठरत आहे. या पोलनुसार टीव्हीकेला 98 ते 120 जागा मिळू शकतात. जो बहुमताच्या 117 या आकड्याच्या अगदी जवळ आहे. अशा स्थितीत टीव्हीके हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची दाट शक्यता आहे. एक्झिट पोलचे निकाल लक्षात घेता सत्तास्थापनेच्या खेळात आपले पारडे जड ठेवण्यासाठी विजय यांनी आतापासूनच आपल्या पक्षाला एकसंध ठेवण्यास सुरूवात केली आहे.

