Sunday, 12 Jul, 5.17 pm सामना

ठळक बातम्या
एन्काऊंटरच्या भितीने गँगस्टर विकास दुबेच्या हस्तकांची टरकली, कानपुरला 'बाय रोड' नको हो, विमानाने न्या!

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार एलिस उर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली होती. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश रश्मी झा यांनी दोघा आरोपींना 21 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघा आरोपींना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

दरम्यान, दोघांना गाडीतून कानपुर येथे न घेऊन जाता हवाई मार्गे विमानातून लखनौ एयरपोर्टला नेण्यात यावे अशी मागणी अटकेतल्या आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात एका लेखी अर्जाद्वारे केली आहे. विकास दुबे चकमकीच्या घटनेमुळे दोघेही आरोपी भयभीत झालेले असून आपल्या जीवाचे बरेवाईट होईल अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे दोघांना फक्त हवाईमार्गे उत्तर प्रदेश येथे नेण्यात यावे असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. ठाणे न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा हा अर्ज रेकॉर्डवर ठेवला असून त्यावर अद्याप कुठलाही निर्णय सुनावलेला नाही.

सध्या दोघा आरोपींना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तेथे त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पत्रकारांना दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातले दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी ठाण्यातील कोलशेत -ढोकाळी परिसरातील एका चाळीतून दोघांना नायक व त्यांच्या पथकाने अटक केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top