Saturday, 25 Sep, 5.30 am सामना

ठळक
एसटीच्या तिकिटात मेट्रोचा प्रवास, नितीन गडकरींचे काम सुरू

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी पुण्यात नवी मेट्रो घेऊन येत आहेत. या मेट्रोसाठी नवे बांधकाम करण्याची गरज नसून पुणे ते सोलापूर, कोल्हापूर, लोणावळा या रेल्वे मार्गांवर धावणार आहे. विशेष म्हणजे एसटीच्या तिकीट दरात या मेट्रोचा प्रवास करता येईल.

पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी या मेट्रोबद्दल अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या मेट्रोचा एक किलोमीटरचा खर्च एक कोटी रुपये एवढाच आहे. आठ डब्यांच्या या मेट्रोत इकाॅनॉमी आणि बिझनेस क्लास असे डबे असतील आणि ती ताशी 120 कि.मी. वेगाने धावेल. यामध्ये एअरहोस्टेस, इंटरनेट, वाय-फाय, टेलिव्हिजन सुविधा असेल, असे गडकरी म्हणाले.

कात्रज चौकातील वाहनांची वर्दळ, वाहतुकीची कोंडी आणि भविष्यातील मेट्रो योजनेच्या विस्ताराच्या दृष्टीने कात्रज चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल दुमजली करण्यात यावा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना याबाबत प्रयत्न करण्याची सूचना केली. देहू-आळंदी ते पंढरपूर असा 234 किलोमीटर लांबीचा पालखी मार्ग सहा टप्प्यांत प्रस्तावित असून त्यापैकी एका टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी भूसंपादनाचा रखडलेला विषय राज्य शासनाने मार्गी लावण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.

नवीन पुणे उभारा

पुणे ते बंगळुरू हा नवीन महामार्ग उभारला जाणार असून 1270 किलोमीटरचा हा मार्ग असेल. या महामार्गाशेजारी नवीन पुणे उभारा अशी सूचना त्यांनी राज्य सरकारला केली.

नरीमन पॉइंट ते दिल्ली 12 तासांत

दिल्ली-मुंबई एक्प्रेस वेचे महाराष्ट्रातील काम शिल्लक आहे. हा मार्ग जेएनपीटीला जोडण्यात येईल. हा एक्प्रेस वे वसई-विरारपासून वरळी-वांद्रेमार्गे नरीमन पॉइंटला जोडला जावा असे वाटते. म्हणजे दिल्ली ते नरीमन पॉइंट हे अंतर 12 तासांत पार करता येईल. हा प्रकल्प मी बांधायला तयार आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे गडकरी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top