Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FIFA World Cup 2026 सेनेगार! सेनेगलचा विजयाचा घास हिरावला; अखेरच्या चार मिनिटांनी बेल्जियमला तारले

FIFA World Cup 2026 सेनेगार! सेनेगलचा विजयाचा घास हिरावला; अखेरच्या चार मिनिटांनी बेल्जियमला तारले

सामना 1 week ago

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या बेल्जियमने अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून विजय खेचून आणला. दोन गोलांनी पिछाडीवर असतानाही अखेरच्या काही मिनिटांत दमदार पुनरागमन करत बेल्जियमने सेनेगलचा 3-2 असा थरारक पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

अतिरिक्त वेळेतील 125 व्या मिनिटाला युरी टायलेमन्स याने पेनल्टीवर झळकावलेल्या गोलने बेल्जियमच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे विजय समोर दिसत असतानाही हातातून सामना निसटल्याने सेनेगलच्या खेळाडूंना मैदान सोडावे लागले.

संपूर्ण 90 मिनिटांपर्यंत सामन्यावर वर्चस्व गाजवणाऱया सेनेगलने बेल्जियमला अक्षरशः हैराण करून सोडले होते. हबीब डियार्रा आणि इस्माईला सार यांच्या गोलांच्या जोरावर आफ्रिकन संघाने 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. बेल्जियमचा विश्वचषक प्रवास इथेच संपणार, असे चित्र निर्माण झाले होते. 25 व्या मिनिटाला सादिओ माने याच्या अचूक क्रॉसनंतर सारचा हेडर पोस्टला लागला, पण परत आलेला चेंडू हबीब डियार्रा याने सात यार्डांवरून सहज जाळ्यात ढकलत सेनेगलला आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर अवघ्या सहा मिनिटांत सेनेगलने आणखी एक घाव घातला. मुसा नियाखाते याच्या लांब पासवर इस्माईला सार याने अप्रतिम चेंडू ताब्यात घेत दोन बचावपटूंना चकवत जोरदार फटका मारला आणि चेंडू थेट जाळ्यात धाडत आघाडी 2-0 अशी केली. दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या बेल्जियमकडे कोणतेही उत्तर दिसत नव्हते. मात्र, सामना संपायला अवघी काही मिनिटे बाकी असताना त्यांनी लढतीत केलेले पुनरागमन काबिले तारीफ ठरले. 86 व्या मिनिटाला थॉमस म्युनियर याच्या लो-क्रॉसवर रोमेलू लुकाकू याने जवळच्या पोस्टजवळ अचूक स्पर्श करत पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत लिएँड्रो ट्रोसार्ड याच्या क्रॉसवर युरी टायलेमन्स याने दमदार हेडर झळकावत सामना 2-2 असा बरोबरीत आणला आणि सिएटलमधील वातावरणच बदलून टाकले.

दबावात टायलेमन्सचा निर्णायक गोल

अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ झाला. सामना पेनल्टी शूटआऊटकडे झुकत असतानाच 125 व्या मिनिटाला निर्णायक क्षण आला. लामिन कामारा याने टायलेमन्सला पाडल्याने व्हिडीओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) तपासणीनंतर बेल्जियमला पेनल्टी मिळाली. दबावाच्या क्षणीही टायलेमन्सने अचूक फटका मारत चेंडू जाळ्याच्या वरच्या कोपऱयात धाडला आणि बेल्जियमच्या थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह बेल्जियमने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला असून आता त्यांचा सामना अमेरिका आणि बोस्निया-हर्झेगोविना यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

सेनेगलचा वेदनादायी पराभव

सेनेगलसाठी हा पराभव अत्यंत वेदनादायी ठरला. संपूर्ण सामन्यात त्यांनी आक्रमक खेळ करत दोनदा चेंडू पोस्टवर आदळवला, बेल्जियमवर सतत दबाव ठेवला, मात्र अखेरच्या काही मिनिटांतील ढिसाळ बचावामुळे विजय हातातून निसटला. दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट आणि डेमोव्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांच्यानंतर राऊंड ऑफ 32 मध्ये अल्प फरकाने पराभूत होणारा सेनेगल हा चौथा आफ्रिकन संघ ठरला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana