Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गाड्या फोडल्या, विटा फेकल्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की! माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर उद्रेक

गाड्या फोडल्या, विटा फेकल्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की! माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर उद्रेक

सामना 1 week ago

केंद्रीय तपास यंत्रणांविषयी जनतेच्या मनात खदखदत असलेल्या संतापाचा आज केरळममध्ये उद्रेक झाला. माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर छापा टाकणाऱ्या ईडीच्या पथकावर संतप्त जमावाने हल्ला चढवला.

केंद्र सरकारविरोधात घोषणा देत जमावाने ईडीच्या ताफ्यावर दगड-विटांचा आणि अंडय़ांचा मारा केला. गाडय़ांच्या काचा फोडल्या. अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली.

विजयन यांच्या मुलीच्या कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने आज केरळममध्ये दहा ते बारा ठिकाणी छापे टाकले. विजयन यांच्या थिरुवअनंतपुरम व कन्नूर येथील निवासस्थानीदेखील ईडीचे पथक पोहोचले. थिरुवअनंतपुरम येथे विजयन यांचे भाड्याचे घर आहे. या घरात ईडीचे अधिकारी तब्बल सात तास होते. ईडीच्या छाप्यांचे वृत्त कळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जिथे-जिथे ईडीचे अधिकारी पोहोचले, तिथे कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. छापासत्र सुरू असताना माकप कार्यकर्त्यांनी विजयन यांच्या घराबाहेरच ठिय्या दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. झडती संपवून ईडीचे पथक परतत असताना जमावाने गाडय़ांना घेराव घालत हल्ला केला.

सुनियोजित हल्ला – विजयन

''ईडीने टाकलेले आजचे छापे हा देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांवर ठरवून केलेला हल्ला आहे. राजकीय सूडभावनेतून ही कारवाई झाली आहे. ही केवळ सुरुवात आहे. मात्र अशा छाप्यांनी आणि कारवायांनी आम्ही घाबरून जाऊ अशा भ्रमात कुणी राहू नये,'' अशी प्रतिक्रिया पी. विजयन यांनी दिली.

काय आहे प्रकरण…

विजयन यांची मुलगी टी. वीणा यांची एक्सालॉजिक सोल्यूशन ही आयटी कंपनी आहे. 2018-19 च्या काळात कोचीन मिनरल्स ऍण्ड रुटाईल या कंपनीने वीणा यांच्या कंपनीला 1.72 कोटी रुपये दिले. एक्सालॉजिक सोल्यूशनने कोणतीही सेवा दिली नाही तरीही 'सीएमआरएल'ने 1.72 कोटी रुपये दिले, असा आरोप आहे. याप्रकरणी आयकर विभागानेही चौकशी केली होती. 2024 मध्ये याप्रकरणी मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात दाखल याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आज ईडीने छापेमारी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana