Saturday, 25 Sep, 6.00 am सामना

ठळक
घाटकोपरमध्ये गरजूंसाठी सुसज्ज दुमजली कम्युनिटी टॉयलेट

गरजूंसह महिला, पुरुष, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घाटकोपरमध्ये सर्व सुविधांनीयुक्त असे दुमजली कम्युनिटी टॉयलेट उभारण्यात आले असून यात 38 शौचकूप, स्नानगृह, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी आणि यांत्रिक कपडे धुलाई सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. शौचालयातील पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुन्हा शौचालयातच वापरासाठी पुरवण्याचे तंत्र असणारे मुंबईतील हे पहिलेच सुविधा केंद्र असून त्यामुळे दरवर्षी 10 दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज याचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबईतील गरजूंना माफक दरात स्वच्छ, सुरक्षित व दुर्गंधीमुक्त अशी प्रसाधनगृहे उपलब्ध व्हावीत, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, कपडे धुण्याची सेवा मिळावी यासाठी मुंबईत महापालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचएसबीसी इंडिया यांनी एकत्रितपणे घाटकोपर (पश्चिम) मधील जगदुशा नगर येथे पर्यावरणस्नेही दुमजली कम्युनिटी टॉयलेट केंद्र उभारण्यात आले आहे.

चांगली शौचालये आणि शुद्ध पिण्याचे पाणी नसल्यास त्यातून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांसह महिला, पुरुष, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न कम्युनिटी टॉयलेटच्या रूपाने करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे 20 हजार नागरिक या केंद्रातील सुविधेचा वापर करतील, असा अंदाज आहे. लोकार्पणावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख राजेंद्र राऊत, 'एन' प्रभाग समिती अध्यक्ष स्नेहल मोरे, नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव, नगरसेवक तुकाराम पाटील, परिमंडळ उपआयुक्त देवीदास क्षीरसागर, सहायक आयुक्त संजय सोनावणे, संजय भालेराव आदी उपस्थित होते.

धारावीत लवकरच 111 शौचकूप असलेले टॉयलेट

मुंबईतील आता एकूण 6 कम्युनिटी टॉयलेट सुरू झाली असून त्यातून स्वच्छ शौचालय, स्नानगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, यांत्रिकी कपडे धुलाई या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईत आवश्यक त्या भागांमध्ये आणखी कम्युनिटी टॉयलेट उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धारावीत 111 शौचकूप असलेल्या कम्युनिटी टॉयलेट उभारणीचे काम सुरू आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत 6 ठिकाणी सुविधा सुरू

मुंबईमध्ये 6 कम्युनिटी टॉयलेट केंद्र उभारण्याचा संयुक्त प्रकल्प मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एचएसबीसी इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत घाटकोपर (पश्चिम) मधील आझाद नगरामध्ये सर्वप्रथम 19 नोव्हेंबर 2016 रोजी पहिले केंद्र, मालाड-मालवणी येथे 29 जुलै 2019, अंधेरीमध्ये 19 नोव्हेंबर 2019, गोवंडीत 15 ऑगस्ट 2020 तर कुर्ला येथे 26 जानेवारी 2021 रोजी कम्युनिटी टॉयलेट सुरू करण्यात आली आहे. धारावीमध्ये सातवे अतिरिक्त केंद्र बांधले जात आहे.

आतापर्यंत 5 केंद्रांतून 35 दशलक्ष लिटर पाण्याची बचत

मुंबईत या आधी उभारण्यात आलेल्या 5 कम्युनिटी टॉयलेटमधून स्नानगृह, हात धुणे, यांत्रिकी पद्धतीने कपडे धुणे इत्यादी सुविधांमधून निघणाऱया सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापरावर भर देण्यात आला. या सर्व 5 सुविधा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 35 दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रामध्ये वार्षिक सुमारे 20 हजार याप्रमाणे 5 केंद्रांमध्ये मिळून सुमारे एक लाख रहिवासी या सुविधांचा लाभ घेतात. कम्युनिटी टॉयलेटच्या उभारणीला युनायटेड वे मुंबई आणि प्रथा सामाजिक संस्था यांचेदेखील पाठबळ लाभले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top