Saturday, 25 Sep, 5.30 am सामना

ठळक
गिरणी कामगारांसाठी चांगली बातमी; मुंबईतील खासगी, एनटीसी गिरण्यांच्या जागेवर चार हजार घरे

मुंबईतील जे गिरणी कामगार 1 जानेवारी 2000 पर्यंत गिरण्यांच्या चाळीमध्ये राहतात त्यांना नियमानुसार 405 स्क्वेअर फुटांचे घर मिळणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी व एनटीसी गिरण्यांच्या जागेवर सुमारे चार हजारपेक्षा अधिक घरे होण्याची चिन्हे आहेत.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत मुंबईतील विविध गिरणी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत गिरणी कामगारांच्या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पाबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. या प्रश्नावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या सह्यांचे एक सविस्तर निवेदन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आले होते. त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी ही बैठक बोलावली होती.

गिरणी कामगारांच्या तीन पिढय़ा मुंबईतील खासगी व एनटीसी गिरण्यांच्या चाळीत वास्तव्यास आहेत. या गिरण्यांच्या चाळींच्या धोकादायक स्थितीची माहिती सचिन अहिर यांनी या बैठकीत दिली. या चाळींची दुरवस्था झाल्याने कधीही अपघात होऊन जीवित व वित्तहानीची शक्यता आहे. त्यामुळे या गिरण्यांच्या चाळींचे म्हाडामार्फत पुनर्वसन व्हावे अशी मागणीही सचिन अहिर यांनी केली आहे. या सर्व प्रश्नांबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 अंतर्गत खासगी मालक किंवा एनटीसी संपूर्ण जमिनीचे पुनर्वसन करू शकत नाही, परंतु नियमानुसार पात्र गिरणी कामगारांना कायद्याने 405 क्षेत्रफळाचे घर मिळणे बंधनकारक आहे, असे सचिन अहिर यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या मागणीबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, एनटीसीचे कार्यकारी प्रमुख मनोज कुमार तसेच सेंच्युरी, बॉम्बे डाइंग, खटाव, मफतलाल, मॉर्डन आदी खासगी मिलचे वरिष्ठ, संबंधित खात्याचे अधिकारी, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे निवृत्ती देसाई व बजरंग चव्हाण उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top