Sunday, 07 Mar, 5.00 am सामना

ठळक
गीता - गांधीजींचे चिंतन

>> अरविंद दोडे

महाभारताचा आत्मा म्हणजे गीता! अवघ्या विश्वतत्त्वाचा सारांश म्हणजे गीता. 'सकल धर्माचे माहेर' असे ज्ञानेश्वरांनी 'गीते'ला म्हटले आहे. जगातल्या थोरामोठय़ांनी गीतेचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. अनेकांना आपल्या काळानुसार गीतार्थ शोधण्याचा नव्याने प्रयत्न केला आहे. म. गांधी हे त्यांच्यातलेच एक अभ्यासक. गीतेत त्यांनी अहिंसवाद शोधताना कौरव-पांडवांमधील युद्धाला सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा मनातील संघर्ष हे रुपक मांडले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. त्याच चिंतनाचा अनुवाद अत्यंत रसाळपणे सादर केला आहे भगवान दातार यांनी. रोहन प्रकाशनाच्या वैविध्यपूर्ण पुस्तकांपैकी हे पुस्तक म्हणजे अध्यात्म विभागाची एक पायरी आहे.

गीतेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत अनासक्तियोग, निष्काम कर्मयोग आणि सत्यासत्य विवेकयोग. या तेजस्वी पैलूंचा परिचय करून देण्यात आला आहे. गांधीजींनी 1926 मध्ये ही व्याख्याने दिली होती. ती वाचताना अजूनही ताजी अन् टवटवीत वाटतात, याचे कारण पार्वतीच्या अक्षय्य नित्यनूतन सौंदर्याप्रमाणे गीताज्ञान आहे म्हणून! मूळ इंग्लिशचा हा अनुवाद भगवान दातारांनी सुरस केल्यामुळे वाचनीय झाला आहे. ही शुद्ध नीतिमूल्यांची शिकवण अठरा अध्यायात आहे. श्रद्धा अनन्य असेल, तर ज्ञानलाभ होतोच, हे तत्त्वज्ञान कुठल्याही व्यक्तीस भक्ती करण्यास पुरेसे आहे. याच अध्यात्मबळावर साधुसंत थोरपदास पोहचले. स्वतःला ओळखण्याचा मार्ग म्हणजे गीतामार्ग. या मार्गावर सामान्यांनी कशी आत्मोन्नती साधावी, हे तर कळतेच, परंतु सुख, शांत आणि समाधानावर भाष्य वाचून वाचकाची वैचारिक पातळी वैश्विकता गाठू शकते. निष्काम कर्मयोगाची व्याख्या अशीच आहे, ती कशी हे गांधीजींनी विस्ताराने सांगितले आहे.

व्यवहारात धर्माला काही स्थान आहे का, कर्मफळाची आशा धरली तर काय होते, तत्त्वज्ञानासाठी युद्धाचे रुपक का निवडले? देवस्मरण हे एकाग्रतेचे मूळतत्त्व आहे का? पशुबळी योग्य आहे का? अशा अनेक सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. दुसरे असे की, संन्यास म्हणजे 'बदल'! परिवर्तनीय जीवनमान जगण्याला आनंददायी परिणाम देते.

'उपसंहारा'त एकंदर गीताबोधनाचा सारांश आहे, 'जोपर्यंत हे शरीर आहे, तोपर्यंत मला महत्त्व आहे. शरीर पडले की, त्याची (म्हणजे माझी!) किंमत शून्य! हे विश्व नष्ट होईन, पण देहातील प्राणतत्त्व कायम राहील…' हे जसे कळते, तशी भक्ती दृढ होते.'

ती कशी? वाचा म्हणजे कळेल.
भगवद्गीता - गांधीजींच्या चिंतनातून महात्मा गांधी
अनुवाद - भगवान दातार
प्रकाशक - रोहन प्रकाशन
पृष्ठ - 280, मूल्य - रुपये 300/-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top