Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान, पंचनाम्यांची कैलास पाटील यांची मागणी; पाहणी दौऱ्यातूनच कृषिमंत्र्यांना थेट फोन

गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान, पंचनाम्यांची कैलास पाटील यांची मागणी; पाहणी दौऱ्यातूनच कृषिमंत्र्यांना थेट फोन

सामना 1 week ago

धाराशिव जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोगलगाईच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाली असून कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर पाहणी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.

तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी कळंब तालुक्यातील भोगजी, बहुला आदी भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी सुरू केली आहे. अनेक गावांमध्ये पेरणी पूर्ण झाली असून काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पावसाचा जोर वाढताच गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे नव्याने उगवलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आमदार कैलास पाटील यांनी पाहणी दौऱ्यातूनच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांचे वाढते नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर कृषिमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यापुढे ज्या क्षेत्रात पेरणी होणार आहे, त्या ठिकाणीही गोगलगाईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही आमदार कैलास पाटील यांनी दिल्या. यावेळी कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana