Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हा मुंबईकरांचा विजय - आदित्य ठाकरे

हा मुंबईकरांचा विजय - आदित्य ठाकरे

सामना 3 weeks ago

मुंबईतील रक्तपेढय़ांचे खासगीकरण आणि तीन मोकळी मैदाने गिळंकृत करण्याचे प्रस्ताव शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने आज मागे घेतले. त्याबद्दल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईकरांचा मोठा विजय झाला अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन आपण या प्रस्तावांना शिवसेना कडाडून विरोध करेल असे सांगितले होते. भाजपनेही मुंबईकरांच्या हितासाठी मिंधे गटाकडून आणल्या जाणाऱ्या या प्रस्तावांना विरोध करावा, असे आवाहन केले होते. प्रस्ताव मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही दिला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

येऊर जंगलातला स्कॅम बाहेर काढणार

येऊरच्या जंगलात खासगी विकासाला शेकडो एकर जमीन महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, येऊरच्या जंगलातला स्कॅम लवकरच लोकांसमोर आणू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मोकळी मैदाने बळकावण्याचे षडयंत्र अपयशी

मुंबई महानगरपालिकेला फुटबॉल मैदानावर एक्झिबिशन सेंटर बनवायचे होते. मलबार हिलमध्ये मोकळे मैदान आहे. त्याच्या बाजूला एका उद्योगपतीचा बंगला बनतोय, त्याला एफएसआय पाहिजे म्हणून त्या मैदानातून जनतेला बाहेर ठेवून ते मैदान स्वतःच्या अंगणात घ्यायचे असे कारस्थान होते. वर्षा बंगल्याजवळील एक हरितपट्टा होता तो निवासी भूखंड म्हणून रुपांतरीत करण्याचा तिसरा प्रस्ताव होता. हे तीनही प्रस्ताव शिवसेनेने हाणून पाडले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईकरांचे रक्त विकण्याचे कारस्थान हाणून पाडले

मुंबईतील रक्तपेढय़ांचे खासगीकरण करण्याचा आणखी एक भयानक प्रस्ताव होता. महापालिकेच्या रक्तपेढय़ांमधून रुग्णांना विनामूल्य रक्त मिळते. खासगीकरण करून ते रक्त विकण्याचा घाट घातला गेला होता. 1100 रुपये दराने एक रक्तपिशवी विकली जाणार होती. मुंबईकरांचे रक्त विकण्याचे ते कारस्थानही शिवसेनेने हाणून पाडले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईचा सौदा कराल तर पराकोटीचा विरोध करू

जनतेसाठी काही मोफत दिले जाणार असेल तर शिवसेनेचा पाठिंबा राहील; पण जनतेच्या सेवांचे खासगीकरण करून त्या भांडवलदारांच्या खिशात घातल्या जात असतील, मुंबईचा सौदा केला जात असेल तर त्याला शिवसेना पराकोटीचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

खारे पाणी गोडे केले असते तर पाणीटंचाई नसती

खारे पाणी गोडे करण्याचा डिसॅलिनेशनचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारने मांडला होता. त्याची अंमलबजावणी झाली असती तर मुंबईला पाणी कमी पडले नसते असे भाष्य आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पाणीटंचाईबद्दल केले. सिद्धिविनायक मंदिर कॉरीडोरच्या मुद्दय़ावरून बोलताना महाविकास आघाडी सरकारनेही एकवीरा देवी व राज्यातील अनेक देवस्थानांसाठी योजना बनवल्या होत्या, त्याचे विद्यमान सरकारने पुढे काय केले हेच माहीत नाही, याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली. मुंबईतील रस्त्यांची कामे रखडली आहेत त्याकडे सरकारचे लक्ष नाही असे सांगत त्यांनी वरळी कोळीवाड्यातील रखडलेल्या मुख्य रस्त्याचे उदाहरण दिले. प्रत्येक वेळी राडे केल्यानंतरच सरकारला जाग येते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

…तर मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानेन

आज प्रस्ताव महापालिकेने मागे घेतले; पण ते रद्द करून पुन्हा दफ्तरी पाठवले जातील तर आणि तरच ते मागे घेतल्याचे मानले जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशावरून ते मागे घेतले असतील तर मी त्यांचे आणि सुधार समितीचे जाहीर आभार मानेन, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana