Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हातांनी रचले दगड. कष्टाने जपले पाणी.मृत तळ्याला घामातून दिली नवसंजीवनी; थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर

हातांनी रचले दगड. कष्टाने जपले पाणी.मृत तळ्याला घामातून दिली नवसंजीवनी; थोरल्या डोंगरावर श्रमदानाचा जागर

सामना 1 week ago

णबरवाडी आणि निगडीच्या सीमेवर वसलेल्या थोरल्या डोंगरावर (ता. कराड) जलसंधारणाचा प्रेरणादायी अध्याय लिहिला गेला. सुमारे सहाशे मीटर उंच डोंगरावर ज्येष्ठ, तरुण आणि बालचमूंने एकत्र येत श्रमदानातून वर्षानुवर्षे दुर्लक्षित मृत तळ्याला नवसंजीवनी दिली.

भर उन्हाळ्यात डोंगर चढून तळ्याची साफसफाई करत त्याचे पुनरुज्जीवन केले. या कष्टांचे फळ आज पावसाळ्यात दिसत असून, हा तलाव पाण्याने भरून ओसंडून वाहत आहे.

थोरल्या डोंगरावरील हे तळे अनेक वर्षांपासून गाळ, दगड, झाडांचा पालापाचोळा, गवत आणि वेली यांनी पूर्णपणे बुजून गेले होते. त्यामुळे पावसाचे पाणी साठण्याऐवजी वाया जात होते. परिसरातील जलस्रोतांची स्थिती सुधारावी, वन्यजीवांना पाण्याचा आधार मिळावा आणि भूजलपातळी वाढण्यास हातभार लागावा या उद्देशाने प्रत्यक्ष श्रमदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उन्हाळ्यात अनेक दिवस सातत्याने मेहनत घेत तळ्यातील गाळ, दगड, पालापाचोळा, वाढलेले गवत आणि वेली हटवल्या. तळ्याचा मूळ आकार पुन्हा तयार करण्यात आला. त्यानंतर तळ्याभोवती दगडी तटबंदी उभारण्यात आली. चंद्रकोरीच्या आकाराच्या या तळ्याची तटबंदी करताना पूर्वेकडील बाजू जाणीवपूर्वक मोकळी ठेवण्यात आली, जेणेकरून डोंगरावरून नैसर्गिकरीत्या वाहून येणारे पावसाचे पाणी थेट तळ्यात जमा होईल. जलसंधारणाचा विचार करून केलेले हे नियोजन आज यशस्वी ठरले.

पहिल्याच पावसाळ्यात या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सध्या लाखो लिटर पाण्याचा साठा येथे झाला आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील जैवविविधता, वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे. तलाव भरल्यानंतरही नागरिकांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. नुकतीच तळ्याची पुन्हा साफसफाई करण्यात आली. तलावातील वाढलेले गवत, वेली, पडलेले दगड आणि उरलेला गाळ काढून तलावाची क्षमता कायम ठेवण्याचे काम करण्यात आले. जलसंधारणाबरोबरच जलस्रोतांचे सातत्याने संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमात सातारा पोलीस दलातील सिद्धनाथ शेडगे, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अमोल मोहिते, मीरा शेडगे, ज्ञानेश्वरी शेडगे तसेच अनेक निसर्गप्रेमी आणि बालचमूंने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सिद्धनाथ शेडगे म्हणाले, की उन्हाळ्यात प्रखर उन्हात केलेल्या श्रमदानाचे फळ आज सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. डोंगरावरील प्रत्येक थेंब अडवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला.

…तर महाराष्ट्र पुन्हा जलसमृद्ध होईल

राजकुमार शेडगे म्हणाले,की निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्या निसर्गाचे ऋण फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. मृतप्राय तळ्याला नवजीवन देताना आम्ही केवळ माती आणि दगड हलवले नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची अमूल्य शिदोरी निर्माण केली आहे. जलसंधारण ही लोकचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक गावाने आणि प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला, तर महाराष्ट्र पुन्हा जलसमृद्ध होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana