Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त, हिंदुत्वाचे तेजस्वी रूप!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त, हिंदुत्वाचे तेजस्वी रूप!

सामना 5 years ago

छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढय़ांनादेखील प्रेरणा देत राहतील, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

'मातोश्री' निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. याप्रसंगी उपस्थित माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार अरविंद सावंत यांनीदेखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिवादन संदेशात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेतृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱया, हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित महाराष्ट्र घडवणे हीच खरी आदरांजली - अजित पवार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. प्रतिभाशाली कलावंतापासून महान राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारा आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणे आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे स्मरण करून अभिवादन केले.

नेताजींचा राष्ट्राभिमान, त्याग सदैव प्रेरणादायी! पराक्रम दिनाच्या दिल्या शुभेच्छा

'नेताजी सुभाषचंद्र बोस प्रखर राष्ट्रभक्त म्हणून देशाच्या सदैव स्मरणात राहतील. त्यांचा राष्ट्राभिमान, त्याग प्रेरणादायी राहील,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त यापुढे त्यांची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या पराक्रम दिनाच्याही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana