Sunday, 19 Jan, 7.56 pm सामना

ठळक बातम्या
हिंदुस्थानात अशी सुरू झाली चलन पद्धती; 'या' देशांनी छापल्या नोटा

चलनी नोटा वापरात येण्यापूर्वी हिंदुस्थानात वस्तूविनीमयाची पध्दत वापरात होती. एखादी वस्तू घेऊन त्याबदल्यात आपल्याकडील वस्तू देऊन व्यापार होत असे. मुघल काळात व्यापारासाठी अशर्फींचा वापर सुरू झाला. तर स्वराज्यामध्ये व्यापारासाठी मोहरांचा वापर होत होता. फ्रेंच, डच आणि इंग्रज हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी व्यापारासाठी चलन पद्धत रुजवली. आता देशाच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापले जाते. मात्र, या आधी या नोटांवर महात्माजींचे छायाचित्र नव्हते. महात्मा गांधींचे छायचित्र नोटांवर छापण्यापर्यंतचा नोटांचा प्रवास रंजक आहे.

पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोव्यात प्रथम चलनी नोटांची सुरूवात केली. तत्कालीन पोर्तुगीज राजा किंग जॉर्ज दुसरा याचे छायाचित्र त्या नोटांवर छापले जात होते. त्या नोटांना एस्कुडो असे म्हटले जात होते.

त्याचवेळी ब्रिटिशांच्या चलनासोबत हैदराबादचा संस्थानिक निजाम याचे स्वतंत्र चलन होते. तो स्वत:च्या वेगळ्या नोटा छापायचा. त्या नोटांच्या मागच्या बाजूला मुद्रा असायची. 1917-18 मध्ये त्याला स्वतःच्या नोटा छापण्याचा अधिकार मिळाला होता.

हिंदुस्थानामध्ये 1923 मध्ये 1,2,5,10,100,1000,10,000 रूपयांच्या या नोटा छापण्यात आल्या होत्या. त्या नोटांवर ब्रिटनचे तत्कालीन राजे सहावे जॉर्ज यांचे छायाचित्र होते.

1938 मध्ये केंद्रीय रिजर्व बैंकची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदा 5 रूपयाची नोट छापण्यात आली. 1940 मध्ये 1 रुपयांची नोट छापण्यात आली. रिजर्व बैंकने 1938 मध्ये 10,100,1000 आणि 10,000 च्या नोटा चलनात आणल्या. त्या नोटांवर सर जेम्स टेलर यांची सही होती.1947 ला हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये हिंदुस्थानने स्वत:ची पहिली नोट छापली, त्यावर अशोक स्तंभाचे छायाचित्र होते. कालांतराने चलनी नोटांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट चलनी नोटांचा वापर रोखण्यासाठी चलनी नोटांमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामध्ये वॉटर मार्क, विशिष्ट शाई , नोटेमध्ये सुरक्षेचा धागा आणि विशिष्ट चिन्ह असे बदल वेळोवेळी करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top