Dailyhunt
हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोना पॉझिटिव्ह

सामना 5 years ago

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोरोनाची लागण झाली असून बुधवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाला याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासोबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सेवक, एक परिचारिकाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल होत उपचार घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जयवंशी यांनी घेतला.

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद अरीबम शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल चार दिवसांपूर्वी आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेतील विविध विभागप्रमुख, संपर्कातील कर्मचारी यांचीही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल काय आला, याबाबत अद्याप जिल्हा शासकीय रुग्णालयाने माहिती दिलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून कोणतीही लक्षणे दिसत नसताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेला दिले होते. याबाबतचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी जयवंशी कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. जयवंशी यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. यासोबतच जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. या वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह आला असून सोबतच एक आरोग्य सेवक व एक परिचारिकाही कोरनाबाधित झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले जाणार असून जयवंशी यांच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करुन त्यांनाही अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana