Sunday, 25 Aug, 3.22 am सामना

ठळक बातम्या
इको फ्रेंडली मूर्तींचे माहेरघर असलेल्या चिरनेरच्या मूर्तिकारांची लगबग अखेरच्या टप्प्यात

राजकुमार भगत

गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असतानाच चिरनेरमधील मूर्तिकारांची मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. सध्या येथील मूर्तीकारांना अजिबात उसंत नसून दिवसरात्र, यंत्रासारखे या मूर्तीकारांचे हात गणेशाच्या मूर्ती घडवत आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण-हमरापूर हे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे तसे उरण तालुक्यात शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्यासाठी चिरनेर गाव प्रसिद्ध आहे.

चिरनेरमधील प्रामुख्याने कुंभार समाजाची लोक हा परंपरागत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतात. बहुतांश भूमीहीन असलेल्या या समाजातील ही लोक उन्हाळ्यात मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून येथील गणेश मूर्तीना मागणी वाढल्याने पूर्वी केवळ हौस आणि परंपरा म्हणून व्यवसाय करणाऱ्या या समाजाच्या लोकांनी या व्यवसायात चांगले बस्तान बसविले आहे. या गावातील नंदकुमार चिरनेरकर, गजानन चौलकर या मूर्तीकारांच्या मूर्तींना तर मोठ-मोठ्या शहरातून मागणी असते. यातील काही मूर्तीकारांच्या मूर्ती परदेशी सुद्धा गेलेल्या आहेत.

पुर्वी शंभर टक्के शाडूच्या मातीपासून ईको फ्रेंडली अशा पर्यावरणाला पुरक गणपतीच्या मूर्ती येथे बनविल्या जात असत. मात्र शाडूमातीच्या मूर्ती या अतिशय नाजूक, खर्चिक असल्याने आणि बाजारात पेणच्या स्वस्त आणि मजबूत मूर्तींना मागणी वाढल्याने चिरनेरमधील कलाकारांनी देखिल कालानुरूप बदल करून पीओपीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. येथे पीओपीच्या मूर्ती जरी बनत असल्या तरी शाडूच्या गणेश मूर्तींना चांगली मागणी असते. शाडूच्या मातीपासून येथे जास्तीत जास्त साडेसात फूट उंचीची येथे मूर्ती बनविली जाते. चिरनेरमध्ये गणेशमूर्ती बनवणारे साधारण 30 ते 35 कारखाने आहेत. यामध्ये सुमारे 5 हजार लहान मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात. चिरनेरच्या गणेश मूर्तीना कोळी समाजातील लोकांकडून जास्त मागणी असते. तालुक्यातील करंजा, मोरा आणि दिघोडा या कोळी समाजाची वस्ती असलेल्या गावातून मोठी मागणी असते. चिरनेरच्या मूर्तींचे रंगकाम हे वेगळे आकर्षण असते. आकर्षक रंग वापरून जास्तीत जास्त मूर्ती आकर्षक कशी दिसेल यासाठी येथील मूर्तीकारांची धडपड असते.

चिरनेरमधिल जेष्ठ मूर्तीकारांसोबत तरूण मूर्तीकारांच्या गणेश मूर्तींना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विष्णू चौलकर, सुनिल चौलकर, प्रसाद चौलकर, चेतन चौलकर, जीवन चौलकर, प्रकाश चिरनेरकर, भालचंद्र हातनोलकर, दिलिप हातनोलकर, विलास हातनोलकर या तरूणांनी या व्यवसायात चांगली झेप घेतली असून नवनवीन कला आणि कल्पना ते आपल्या मूर्तीकलेतून साकार करत आहेत.

चिरनेरमधील हे मूर्तिकार आपली कला जोपासत असतानाच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत बोलताना नंदकुमार चिरनेरकर या नावाजलेल्या मुर्तिकाराने सांगितले की, दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गणपतीसाठीचे रंग, माती, यांचे भाव वाढले आहेत. रंगाचे भावही प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे या वर्षी मूर्तींच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. चिरनेरमध्ये सर्वात मोठ्या शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविल्या जातात. त्या तुम्हाला पेण आणि मोठ्या शहरात देखिल मिळणार नाही. शासनाने शाडूच्या मातीला जीएसटी लावलेला नसला तरी पीओपीला जीएसटी भरावा लागत असल्याने त्याचा परिणाम मूर्तींवर झालेला आहे. शाडूच्या मातीचे कलाकार आत्ता दुर्मिळ होत असल्याने अडचण होत आहे. चिरनेर मध्ये मातीची एक फुटाची गणपतीची मूर्ती साधारण दोन ते अडीच हजारांना मिळते तर प्लास्टरची एक फुटाची मूर्ती दीड हजार ते सतराशे पर्यंत विकली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top