Monday, 11 Nov, 10.37 am सामना

विदेश
इम्रान खान यांनी विचारले आमचा सिद्धू कुठे आहे?

पाकड्यांचा पाठिंबा असलेल्या दहशतवाद्यांचे हिंदुस्थानच्या सीमेवरील हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. त्यातच काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेले आहेत. एकीकडे त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना 'सिकंदर' म्हटले असतानाच इम्रान खान यांनीही 'आमचा सिद्धू कुठे आहे?' अशी सिद्धू यांची चौकशी केली. इम्रान ही चौकशी करत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय.

कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एका बसमध्ये बसले होते. तेथे उपस्थित लोकांकडे ते 'आमचा सिद्धू कुठे आहे? तो आला का?' अशी चौकशी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी तेथील एका मंत्र्याने म्हटले, हिंदुस्थान सरकारने सिद्धू यांना येथे येण्यास रोखले असते तर ती मोठीच बातमी झाली असती. दरम्यान, इम्रान यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही चौकशी केलेली व्हिडीओत दिसत आहे.

उद्घाटन सोहळ्यात तर सिद्धू यांनी इम्रान खान यांच्यावर स्तुतिसुमनांची खैरातच केली. ते म्हणाले, कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करत इम्रान खान यांनी हिंदुस्थानातील 14 कोटी शीख समुदायाचे मन जिंकले आहे. या दृष्टीने इम्रान हे सिकंदरच म्हटले पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढेच बोलून सिद्धू थांबले नाहीत, तर कॉरिडॉरची सुरुवात करून इम्रान यांनी इतिहास रचला आहे अशा दाढी कुरवाळणाऱया शब्दांत सिद्धू यांनी इम्रान यांची तारीफ केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक कविताही म्हटली.

मोदींनाही मुन्नाभाईवाली झप्पी

काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्तुती करण्यात हरवून गेले. मात्र काही वेळातच भानावर येत त्यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, फाळणीनंतर प्रथमच दोन्ही देशांमधील सीमा खुल्या झाल्या आहेत. याचे श्रेय माझे मित्र इम्रान खान यांचे आहे हे कुणीच नाकारू शकणार नाही. यासाठी मी पंतप्रधान मोदींचेही आभार मानतो. मी मोदी साहेबांना मुन्नाभाईची झप्पी पाठवतो, असेही सिद्धू म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top