Dailyhunt
IPL 2026 - डेव्हिडचे तुफान आलंया.बंगळुरूकडूनही चेन्नईचा धुव्वा

IPL 2026 - डेव्हिडचे तुफान आलंया.बंगळुरूकडूनही चेन्नईचा धुव्वा

सामना 3 weeks ago

तविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या दुसऱया विजयाची नोंद करताना चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांची फडशा पाडला. चेन्नईला सलग तिसऱया पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. टीम डेव्हिडच्या घणाघाती फलंदाजीने बंगळुरूला अनपेक्षितपणे 250 धावांचा डोंगर उभारून दिला आणि मग चेन्नईच्या फलंदाजांना 207 धावांवर रोखले.

25 चेंडूंत 8 षटकारांचा पाऊस पाडणाऱया डेव्हिडने 70 धावांच्या अभेद्य खेळीच्या जोरावर सामनावीर पुरस्कारावरही आपले नाव कोरले.

बंगळुरूचे 251 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवलेच नाही. सॅमसन (9), ऋतुराज गायकवाड (7) आणि आयुष म्हात्रे (1) हे तिन्ही आघाडीवीर पहिल्या तीन षटकांत बाद झाले आणि चेन्नईने येथेच हार मानली. सरफराज खानने 50 धावांची खेळी करत चेन्नईच्या डावाला वेग दिला. तळाला प्रशांत वीर (43) आणि
जॅमी ओव्हरटन (37) यांनी संघाची धावसंख्या द्विशतकापार नेण्यासाठी हातभार लावला, पण चेन्नईने सामना आधीच गमावला होता. अखेर त्यांचा डाव 207 धावांवर संपला.

फलंदाजांचा धडाका, 250 धावांचा डोंगर

चेन्नईने टॉस जिंकून आरसीबीला फलंदाजी दिली आणि आरसीबीच्या फलंदाजांनी सीएसकेच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 3 बाद 250 धावांचा एव्हरेस्ट उभारला, जो या हंगामातील सर्वोच्च स्कोअर ठरला. आज बंगळुरूच्या पाचही फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. विराट कोहली 28 धावांवर बाद झाला, तर फिल सॉल्टने 46 धावा चोपून काढल्या. मग देवदत्त पडिक्कलने 50 धावा काढताना रजत पाटीदारसह 58 धावांची भर घातली. ही विकेट पडली तेव्हा बंगळुरूच्या 151 धावा होत्या. त्यानंतर चिन्नास्वामीवर टिम डेविडचे वादळ घोंगावले. शेवटच्या 5 षटकांत 97 धावा फोडून काढत बंगळुरूने अडीचशेचा टप्पा गाठला. रजत पाटीदारनेही 18 चेंडूंत 6 षटकार खेचत नाबाद 48 धावा केल्या. हीच भागी संघाला विजय मिळवून देणारी ठरली. दोघांनी 36 चेंडूंत 99 धावांचा पाऊस पाडला.

भुवनेश्वरची 'डबल सेंच्युरी'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करत आयपीएलमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. आयुष म्हात्रेचा बळी घेत त्याने हा टप्पा गाठला. याआधी केवळ युजवेंद्र चहलनेच 200 पेक्षा अधिक विकेट्सचा पराक्रम केला होता.

द्रविडकुंबळे स्टँडचे अनावरण

चिन्नास्वामी स्टेडियमवर राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नावाने स्टँडचे अनावरण करण्यात आले. केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद आणि उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. द्रविडच्या नावाने बीईएमएल एण्ड , तर कुंबळेच्या नावाने पॅव्हेलियन एण्ड नामांकित करण्यात आला. तसेच माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही सन्मान देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana