Dailyhunt
IPL 2026 - हॅटट्रिक ऑफ हीरो

IPL 2026 - हॅटट्रिक ऑफ हीरो

सामना 3 weeks ago

यपीएलमध्ये सलग तीन 'प्लेयर ऑफ द मॅच' जिंकणं म्हणजे केवळ फॉर्म नाही, तर थेट वर्चस्वाची घोषणा असते. आता या खास क्लबमध्ये दिल्लीचा नव्या दमाचा स्फोटक फलंदाज समीर रिझवीने एण्ट्री केली आहे.

आता त्याला सलग चौथ्यांदा हा पराक्रम करून क्रिकेटविश्वाला हादरवण्याची संधी आहे. या आधी आयपीएलमध्ये जॅक कॅलिस, वीरेंद्र सेहवाग, एरॉन फिंच, वीराट कोहली, जोस बटलर आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलग तीनदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. समीरने 2025 च्या शेवटच्या सामन्यात 25 चेंडूंत नाबाद 58 ठोकत पंजाबविरुद्ध सामना फिरवला होता. 2026 मध्ये लखनऊविरुद्ध 70 आणि मुंबईविरुद्ध 90 धावा करत सलग तिसरा किताब जिंकला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही त्याने जबरदस्त प्रभाव दाखवला आहे. आता 'सलग चार' सामनावीर जिंकण्याचा इतिहास रचण्याच्या उंबरठय़ावर तो पोहोचला असून असा विक्रम अद्याप एकाही फलंदाजाला शक्य झालेला नाही.

सुनील गावसकर अगामी रिऍल्टीचे ब्रँड ऍम्बेसेडर

क्रिकेट विश्वातील दिग्गज सुनील गावसकर यांची अगामी रिऍल्टीच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्त, प्रामाणिकपणा आणि वारशाची जपणूक या त्यांच्या गुणांमुळे ही भागीदारी विशेष ठरते. आकर्षक चेहऱयांऐवजी विश्वासार्ह व्यक्तिमत्त्वावर भर देत कंपनीने ठोस निर्णय घेतला आहे. गावसकर यांनीही ब्रॅण्डच्या मूल्यांशी आपले विचार जुळत असल्याचे सांगितले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत खंडेलवाल यांच्या मते, या सहकार्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, लक्झरी प्रकल्पांमध्ये ब्रॅण्डची ओळख भक्कम होईल.

मुंबई पोलिसांचा विजय

76व्या सालारजंग आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत मुंबई पोलीस जिमखाना संघाने अपोलो क्रिकेट क्लबवर 39 धावांनी विजय मिळवला. मरीन लाईन्स येथील मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात शनिवारी अपोलो क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डावखुरा वनडाऊन तनिष मेहेरच्या 41 चेंडूंत 77 धावांच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर मुंबई पोलीस जिमखाना संघाने 20 षटकांत 8 बाद 211 धावा केल्या. त्याच्या मॅरेथॉन खेळीत 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. तनिषला सलामीवीर अल्टमस शेख (33) आणि चौथ्या क्रमांकावरील रोहित पोळची (33) चांगली साथ लाभली. अपोलो क्लबकडून मध्यमगती दुकली वरुण मलिक (3/33) आणि आकाश पवारने (3/45) चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल, अपोलो क्रिकेट क्लबला 20 षटकांत 3 बाद 172 धावा करता आल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana