जयपूरच्या गुलाबी शहरात सामना रंगणार असला तरी दिल्ली कॅपिटल्ससाठी तो अस्तित्वाचा लढा आहे. हा संघ म्हणजे एखाद्या रोलर-कोस्टरसारखाच खेळतोय. एका वळणावर 250 धावा, तर दुसऱ्या वळणावर 75 वर ऑलआऊट.
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ अजून स्वतःला शोधतोय. गुजरातविरुद्धचा एका धावाने निसटलेला सामना हा फक्त पराभव नव्हता, तो मानसिक धक्का होता. दुसरीकडे राजस्थान सातवा विजय ठोकून प्ले ऑफचे आपले गणित पक्के करण्यासाठी उतरणार आहे. त्यांच्यासाठी घरच्या मैदानावरील ही एक सामान्य लढत आहे, पण दिल्लीसाठी सर्व काही. या संघर्षात पुनरागमन करणारा मिचेल स्टार्क दिल्लीसाठी स्पार्क ठरतोय की वैभव सूर्यवंशीचा आणखी एक हवाई हल्ला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर तीन विजय, चार पराभव आणि गुणतालिकेत सातवे स्थान. आकडे सांगतात, पण खरी गोष्ट म्हणजे संघात सातत्याचा पूर्ण अभाव. राहुल, मिलर, स्टब्स, रिझवी यांनी धावांच्या ठिणग्या टाकल्या, पण ज्योत पेटलीच नाही. अभिषेक पोरेलने मागील सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केलेली झुंज ही अंधारातली छोटी काडी ठरली.
स्टार्कमुळेदिल्लीला ऑक्सिजन की फक्त हवा?
गोलंदाजी हा दिल्लीचा दुसरा डोकेदुखीचा विषय. 75 धावांवर गुंडाळल्यानंतर त्यांना या धावांचा साधं रक्षणही करता आलं नाही. म्हणजे गोलंदाजांची धार बोथट झाली आहे. पण आता ऑस्ट्रेलियन वादळ मिचेल स्टार्क परततोय. त्याच्या हातात चेंडू आला की विकेट्स हलतात. लुंगी एनगिडी नसताना स्टार्कची एण्ट्री म्हणजे तहानलेल्या माणसाला पाण्याचा घोट मिळण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच की, एकटा स्टार्क किती लढणार? बाकी गोलंदाजांनी साथ दिली नाही, तर हा घोट वाळवंटातल्या थेंबासारखा ठरेल.
राजस्थान टॉप गिअरमध्येच
राजस्थान रॉयल्स सध्या वेगळय़ाच फॉर्मात आहे. त्यांच्या फलंदाजीचा टॉप गिअर इतका जोरात आहे की, समोरचा गोलंदाज ब्रेक शोधत बसतो. वैभव सूर्यवंशी हे नाव नवीन, पण खेळात दमदार बेधडकपणा आणतोय. बुमरा, हेझलवूड, कमिन्स यांना तो जणू नेट प्रॅक्टिससारखा खेळतो.
यशस्वी जैसवालची बॅट तर जणू गाणं गातेय. टायमिंग, क्लास आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम. सहा विजयांसह चौथ्या स्थानावर असलेला राजस्थान फक्त जिंकत नाही, तो प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकतोय. पंजाबला हरवून त्यांनी दाखवलं की, ही टीम फक्त स्पर्धक नाही, दावेदार आहे.
राजस्थानची मधली फळीदेखील आता फॉर्ममध्ये आलीय. त्यामुळे त्यांची फलंदाजी आता फक्त सुरुवातीवर अवलंबून नाही. प्रत्येक टप्प्यावर धावा येतात आणि प्रतिस्पर्ध्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. मधली फळीच त्यांची खरी ताकद ठरतेय.
दिल्लीसाठी समीकरण अगदी स्पष्ट आहे. एकटय़ा खेळाडूंनी नव्हे, तर संपूर्ण संघाने उभं राहायला हवं. स्टार्कने विकेट्स घेतल्या तरच राजस्थानचा वेग कमी होईल. नाहीतर जयपूरच्या मैदानावर राजस्थानचं वादळ दिल्लीचा तंबू उडवून नेईल हे कुणाला वेगळं सांगावं लागणार नाही.

