Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL 2026 - वैभव वादळात उडाले हैदराबाद; 'सिक्सर प्रिन्स' सूर्यवंशीचा राज्याभिषेक, राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक

IPL 2026 - वैभव वादळात उडाले हैदराबाद; 'सिक्सर प्रिन्स' सूर्यवंशीचा राज्याभिषेक, राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक

सामना 2 weeks ago

काही खेळी धावसंख्येत मोजता येत नाहीत… त्या रिश्टर स्केलवर मोजाव्या लागतात. 'वंडर अन् थंडरबॉय' वैभव सूर्यवंशीची आजची इनिंग तशीच होती. हा 15 वर्षांचा पोरगा बॅटिंग करत नव्हता, तो मैदानावर 'मिसाईल टेस्टिंग' करत होता.

त्याच्या बॅटला चेंडू लागला की हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स फक्त वर आकाशाकडे बघायचा. कारण चेंडू कुठे गेला ते जमिनीवर शोधून सापडत नव्हते. वैभवच्या 29 चेंडूंतील 97 धावांच्या खेळीने चंदिगडच्या महाराजा यादविंद्र स्टेडियमवर सिक्सरची अशी आतषबाजी केली की दिवाळीचे फटाकेही फिके पडले. वैभवच्या षटकारांनीच आज सिक्सर प्रिन्स म्हणून त्याचे राज्याभिषेक केले. त्याच्या राज्याभिषेकानंतर उभारलेल्या 244 धावांच्या आव्हानाखाली हैदराबादचा डेंजर संघ 196 धावांतच चिरडला गेला आणि राजस्थानने राजेशाही थाटात क्वालिफायर 2 म्हणजेच उपांत्य फेरीत धडक मारली. आता शुक्रवारी 29 मेला त्यांची लढाई गुजरातशी होईल. या सामन्यात जो जिंकेल तो जेतेपदाच्या ट्रॉफीसाठी गतविजेत्या बंगळुरूशी भिडेल.

वैभवच्या 8 रिश्टर स्केलच्या त्सुनामी खेळीला हैदराबादकडून तितक्याच रिश्टरचे प्रत्युत्तर मिळेल अशी अपेक्षा होती; पण हैदराबादच्या धुरंधरांनी पॉवरप्लेमध्येच माती खाल्ली. जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्मा (0), इशान किशन (33)आणि ट्रॅव्हिस हेड (17) यांची पॉवरप्लेमध्येच विकेट काढत 4 बाद 57 अशी केविलवाणी अवस्था केली. पुढे हेन्रिक क्लासनही (18) बाद झाला. तिथेच हैदराबादने मान टाकली. पण नितेश रेड्डी (38) आणि सलील अरोरा (35) यांनी शेवटची तडफड दाखवली. त्यामुळेच हैदराबादचा संघ धडपडत 196 धावांपर्यंत पोहोचला आणि राजस्थानने 47 धावांनी एलिमिनीटरचे मैदान मारले.

वैभवची सर्जिकल स्ट्राइक

वैभवने पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला हवेत उडवून आज रॉकेट नव्हे, मिसाईल टाकणार असल्याचे दाखवले. त्यानंतर जे सुरू झालं त्याला क्रिकेट नाही, 'सिक्सरचा सर्जिकल स्ट्राईक' म्हणतात. पॉवरप्ले संपायच्या आतच समालोचकांचे शब्द संपले होते. गोलंदाज चेंडू टाकत होते आणि वैभव त्यांना व्हिसा न काढताच सीमारेषेबाहेर 'डिपोर्ट' करत होता. पुल, फ्लिक, स्ट्रेट ड्राइव्ह… प्रत्येक फटका हैदराबादच्या ड्रेसिंग रूममध्ये बॉम्बसारखा फुटत होता. वैभवची शक्तिशाली फलंदाजी पाहून सारेच थक्क होत होते. वैभवच्या फटक्यांचा वेग वादळी होता. त्याने 16 चेंडूंत अर्धशतक साजरे केले. त्याचे मिसाइल हल्ले चक्रावणारे होते. या खेळीत 8 षटकार आणि 1 चौकार होता. म्हणजेच 16 चेंडूंतील 54 धावांत 54 धावा षटकार-चौकारांच्या होत्या. हा स्कोअर नव्हता, हा हैदराबादी गोलंदाजीवर केलेला उघड उघड दरोडा होता.

गेलच्या विक्रमांचा सूर्यवंशी कर्दनकाळ

ख्रिस गेलच्या एका मोसमातील 59 षटकारांच्या विक्रमाला 14 वर्षं कोणी शिवलं नव्हतं. लोक म्हणायचे, 'हा एव्हरेस्ट आहे'. पण आज 15 वर्षांच्या सिक्सर प्रिन्सने तो एव्हरेस्ट बेस कॅम्प बनवला. आता वैभव त्याला एव्हरेस्टवर नेऊन ठेवेल. आता त्याने यंदा 65 षटकार ठोकलेत. अजून त्याला किमान 2 सामने खेळायचेत. आजच्या 12 षटकारांमुळे तो आयपीएलच्या इतिहासात '60 षटकारांचे शिखर' सर करणारा पहिलाच षटकारवीर ठरला आहे.

IPL 2026 – लाईव्ह की हायलाईट… वैभवने केलेली कत्तल पाहून क्रीडाप्रेमी थक्क; विरोधी खेळाडूंनीही थोपटली पाठ

3 धावांनी शतक हुकलं, पण काळजाचा ठोका चुकवला

वैभवच्या झंझावाताने 28 चेंडूंत 97 धावा उधळल्या होत्या. समोर 30 चेंडूंतलं सर्वात वादळी शतकाचा इतिहास उभा होता. प्रफुल हिंगेच्या षटकात पहिल्या 5 चेंडूंत 29 धावा काढल्या होत्या. स्टेडियममध्ये 'वैभव… वैभव'चा गजर सुरू झाला. डगआउटमध्ये पाणी पिणारे उभेच राहिले. कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटरचा आवाज फुटायची वेळ आली. आणि मग आला तो क्षण. सहावा चेंडू. वैभवने डोळे मिटून इतिहास लिहायला बॅट फिरवली; पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. चेंडू गॅलरीत न जाता थेट स्मरणच्या हातात विसावला. दोन सेकंद… अख्खं स्टेडियम सुन्न. कारण शतक हुकलं नव्हतं. क्रिकेटच्या देवाने शेवटच्या पानावर पेन खाली ठेवला होता. त्याचा थांबलेला झंझावात पाहून हैदराबादचे चाहतेही सुन्नं झाले होते. त्याचा झंझावात सारेच डोळे विस्फारून पाहत होते. गेलचा विक्रम सूर्यवंशीने मोडावा अशी सर्वांची इच्छा होती, पण ती अपुरी राहिली. शतकांचा विक्रम हुकला. 17 षटकारांचाही विक्रम मागे राहिला. वैभवने आपल्या खेळीत 12 षटकार आणि 5 चौकार खेचत 92 धावा वसूल केल्या. तसेच त्याने सुदर्शनच्या डोक्यावर असलेली ऑरेंज कॅप 680 धावा करत उडवली.

300 च्या दिशेने धावणाऱया राजस्थानलाअचानक ब्रेक

वैभवची त्सुनामी 97 वर थांबली, पण ध्रुव जुरेलने दुसरी लाट आणली. 21 चेंडूंत 50 धावा. 14 षटकांत स्कोअर 197 होता. स्कोअरबोर्ड बघून वाटलं, आज 300 नक्की. टीव्ही स्क्रीनवर आकडेही दिसत होते. पण क्रिकेट म्हणजे सासूची माया. एका मिनिटात डोक्यावर घेईल, दुसऱया मिनिटाला खाली आपटेल. तेव्हा जुरेल गेला… आणि राजस्थानच्या इनिंगला जणू कोणाची तरी नजर लागली. शेवटच्या 6 षटकांत फक्त 46 धावा. 5 विकेट्स सुक्या पानासारख्या गळून पडल्या आणि 300चं बोईंग पकडायला निघालेला राजस्थान 243 धावांवरच लॅण्ड झाला. प्रफुल हिंगेला जोरदार चोप पडला खरा, पण त्याने शेवटच्या क्षणी 3 विकेट घेत राजस्थानच्या सुस्साट घोड्याला रोखले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana