क्रिकेट कधीकधी क्रूर असतं. एका बाजूला 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी संपूर्ण देशाला टीव्हीसमोर खिळवून ठेवत होता, तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिल राजस्थानच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरवत होता.
सूर्यवंशीने पुन्हा एकदा आकाशात षटकारांचे दिवे लावले. मिसाईल सोडले, पण राजस्थानच्या गोलंदाजांनी ते दिवे स्वतःच विझवले. 215 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य गुजरात टायटन्सने 18.4 षटकांत चिरडून टाकले आणि आपल्या पाच वर्षांच्या आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी अहमदाबादच्या स्टेडियमवर गुजरात आणि बंगळुरू यांच्यात दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी महासंग्राम रंगेल.
राजस्थानने धावा केल्या होत्या, पण गोलंदाजांनी जणू त्यांच्यावरच विश्वासघात केला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीवीरांनी राजस्थानच्या गोलंदाजीला अक्षरशः बाजार दाखवला. चौकार-षटकारांचा पाऊस पाडत त्यांनी अवघ्या 12.5 षटकांत 167 धावांची भागीदारी उभारली आणि सामना तेव्हाच गुजरातच्या खिशात टाकला. सुदर्शन 58 धावांवर एक विचित्र प्रकारे बाद झाला. सीमारेषेबाहेर फटका मारल्यानंतर त्याच्या हातातून बॅट सुटली आणि थेट स्टम्पवर आदळली. आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा हिटविकेट होण्याचा दुर्मिळ विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. मात्र त्यानंतर गिलने राजस्थानच्या जखमेवर मीठ चोळले. त्याने अवघ्या 47 चेंडूंमध्ये शतक साजरे केले. 53 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांसह त्याने 104 धावांचा राजेशाही डाव खेळला. त्यानंतर जोस बटलर आणि राहुल तेवतियाने उरलेली औपचारिकता पूर्ण करत गुजरातला अंतिम फेरीचे तिकीट बहाल केले.
शुभमन आणि साईला ऑरेंज पॅपची संधी
गुजरातच्या वीजयात शुभमन गील आणि साई सुदर्शन यांनी मोलाचा वाटा उचलला. शुभमनने 104 धावांची खेळी साकारली तर साईने 58 धावा केल्या. त्यामुळे हे दोघेही ऑरेंज पॅपच्या शर्यतीत दाखल झाले आहे. शुभमनच्या एकूण 722 तर साईच्या 710 धावा झाल्या आहेत. या यादीत अव्वल स्थानावर वैभव सुर्यवंशी 776 धावांनिशी आहे.
अवघा हिंदुस्थान त्याच्या फटकेबाजीने थांबला
कधीकाळी सचिन तेंडुलकर फलंदाजीला आला की देशातील रस्ते ओस पडायचे. आज तीच जादू वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून झिरपत आहे. हा मुलगा फलंदाजीला आला की मोबाईलचे स्क्रीन लॉक होत नाहीत आणि टीव्हीसमोरून कुणी हलत नाही. आजही तेच घडलं. गुजरातचे गोलंदाज चेंडू टाकत होते, पण प्रेक्षकांच्या नजरा फक्त वैभवच्या बॅटवर खिळल्या होत्या. त्याचा प्रत्येक चौकार आनंदाची रेष उमटवत होता आणि प्रत्येक षटकाराने स्टेडियम हादरत होतं. विरोधी संघाचे खेळाडूही क्षणभर त्याचा खेळ पाहण्यात हरवले होते. सर्वांना त्याची बॅट उंचावलेली पाहायची होती. शतकानंतरचा तो क्षण टिपायचा होता. पण नियतीला अजून थोडी मजा घ्यायची होती.
96 धावांवर उभा असलेला वैभव पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठय़ावरून खाली ढकलला गेला. तो बाद झाला आणि जणू लाखो चाहत्यांच्या छातीत एकाच वेळी कळ उठली. सर्वांना वाटत होतं, अरे, थोडं सांभाळून खेळ. पण हा मुलगा वेगळ्या मातीचा आहे. त्याच्या शब्दकोशात सांभाळून हा शब्दच नाही. तो जसा जगतो तसाच खेळतो. निर्भीड, बिनधास्त आणि बेधडक. त्याची फलंदाजी पाहताना आता एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली आहे की, हिंदुस्थानी क्रिकेटला पुन्हा एकदा लोकांना थांबवणारा, टीव्हीसमोर खिळवून ठेवणारा सुपरस्टार मिळालाय.
चार डावात तिसऱ्यांदा नव्वदीत बाद
नव्वदी जणू वैभवचा पाठलाग करत आहे. लखनौविरुद्ध 93, हैदराबादविरुद्ध 97 आणि आता गुजरातविरुद्ध 96. गेल्या चार डावांत तिसऱ्यांदा शतक त्याच्यापासून काही पावलांवर उभं राहिलं आणि तिसऱ्यांदा त्याने त्याला हात लावण्याआधीच ते विरघळून गेलं. आज तर प्रशिक्षक कुमार संगकाराने खास संदेश पाठवला होता, थोडं संयम ठेव, पण संयम आणि वैभव यांचं नातं अजून जुळलेलं नाही. रबाडाचा साडेसहा फूट उंच उसळणारा चेंडू त्याने पुन्हा सीमारेषेपलीकडे पाठवायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र हवेत गेला आणि त्याचं तिसरं शतक पुन्हा हवेतच विरलं. एका मोसमात तीनदा नव्वदीत बाद होणारा तो आयपीएल इतिहासातील दुसराच फलंदाज ठरला. याआधी 2014 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने हा दुर्दैवी पराक्रम केला होता. तरीही त्याच्या 7 षटकार आणि 8 चौकारांनी सजलेल्या 96 धावांच्या खेळीने राजस्थानला लढण्याची ताकद दिली. यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल आणि रियान पराग अपयशी ठरले, पण बढती मिळालेल्या रवींद्र जाडेजा आणि डोनोवन फरेराने शेवटच्या षटकांत धुमाकूळ घातला. फरेराने 11 चेंडूंमध्ये 38 धावा ठोकत राजस्थानला 214 धावांपर्यंत नेले. तेव्हा वाटलं होतं, ही धावसंख्या फायनलचं तिकीट ठरवेल.पण गिल नावाचं वादळ दुसऱ्या बाजूला उभं होतं.
16 वरून थेट पाचव्या स्थानावर
वैभव सूर्यवंशी 680 धावांसह एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत 16 व्या स्थानावर होता. मात्र आज त्याने एकेक टप्पा गाठत तब्बल 11 फलंदाजांना मागे टाकत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली. आता त्याच्या 776 धावा झाल्या असून तो एका मोसमात 700 पेक्षा अधिक धावा करणारा 10 वा फलंदाज आहे. आता त्याच्या पुढे फक्त विराट कोहली (973), शुभमन गिल (890), जोस बटलर (863) आणि डेव्हिड वॉर्नर (848) हे चौघेच आहेत. तसेच गेल्या मोसमात 7 सामन्यांत 252 धावा करणाऱ्या वैभवने यंदा 16 सामन्यांत 776 धावा केल्या आणि 23 व्या सामन्यातच आयपीएलच्या हजार धावांचा टप्पाही गाठला.

