Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL 2026 - या वयात आम्हाला गोट्या अन् गल्ली क्रिकेटही नीट खेळता येत नव्हतं. वैभव सूर्यवंशीपुढे 'महानायक' नतमस्तक!

IPL 2026 - या वयात आम्हाला गोट्या अन् गल्ली क्रिकेटही नीट खेळता येत नव्हतं. वैभव सूर्यवंशीपुढे 'महानायक' नतमस्तक!

सामना 2 weeks ago

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी याने धावांचा पाऊस पाडला. ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये टॉपवर असलेल्या वैभवने अनेक वर्षांपासून अबाधित असलेले विक्रम मोडीत काढले.

नुकताच त्याने ख्रिस गेल याचा एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला.

वैभव सूर्यवंशी जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात त्याने एकामागून एक सरस खेळी केल्या. राजस्थानच्या संघातील इतर खेळाडू चाचपडत खेळत असताना वैभव ‘वन मॅन आर्मी’ सारखा खंबीरपणे उभा राहिला आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडला. पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा करत त्याने राजस्थानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला.

जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांनाही त्याने बॅटने पाणी पाजले. चेंडू टप्प्यात आला की तो सीमारेषेबाहेर गेलाच पाहिजे या आदिर्भावात खेळणाऱ्या वैभवने क्रिकेट चाहत्यांना वेड लावले आहे. प्लेऑफमध्येही त्याने आपल्या बॅटची जादू दाखवून दिले. भलेही दोन्ही वेळेस त्याचे शतक हुकले असले तरी त्याने मैदानात शड्डू ठोकून संघाला धावांचा डोंगर उभा करून दिला. त्याच्या याच तोडफोड फलंदाजीवर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही फिदा झाले आहेत.

शुक्रवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या ‘क्वालिफायर 2’ सामन्यानंतर बिग बींनी आपल्या एक्स अकाऊंटवर वैभवसाठी एक कौतुकाची पोस्ट लिहिली. वैभव सूर्यवंशी हा वयाच्या 15 व्या वर्षी तळपणाला ‘सूर्य’ आहे. या वयात तर आम्हाला गोट्या आणि गल्ली क्रिकेटही धड खेळता येत नव्हतं. 15 व्या वर्षी वैभव जे काही करत आहे, ते अद्भूत आणि अविश्वसनीय आहे, अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी त्याचे कौतुक केले.

अंतिम सामन्याची संधी हुकली, पण वैभवने मनं जिंकली!

न्यू चंदीगड येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात वैभवने ज्या प्रकारे जबाबदारी अंगावर घेतली आणि 47 चेंडूत 96 धावांची खेळी केली ती क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. यंदाच्या हंगामात त्याची बॅट दांडपट्ट्याप्रमाणे फिरली आणि 16 डावात त्याने तब्बल 776 धावांची लयलूट केली. 48.50 ची सरासरी, 237.50 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा चोपल्या. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana