इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील ९०० वर्षे जुन्या ऐतिहासिक ब्युफोर्ट'किल्ल्यावर आणि त्यालगतच्या महत्त्वाच्या टेकडीवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा भाग इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाचा एक महत्त्वाचा अड्डा होता आणि येथून इस्रायलवर अनेक हल्ले केले जात होते.
एप्रिलमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम लागू झालेला असताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. युद्धविरामाला सहा आठवड्यांहून अधिक काळ लोटूनही दोन्ही बाजूंमध्ये अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ब्युफोर्ट रिज आणि वादी अल-सलुकी क्षेत्रावर नियंत्रण मिळवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हिजबुल्लाने इराणच्या मदतीने या भागात मोठा लष्करी तळ उभारला होता, असा दावा लष्कराने केला आहे. त्यामुळे या कारवाईदरम्यान हिजबुल्लाचे तळ आणि त्यांच्या लष्करी सुविधांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले.
इस्रायलचा एक सैनिक ठार
या कारवाईत इस्रायलचा एक सैनिकही मारला गेला आहे. दुसरीकडे लेबनॉन सरकार आणि हिजबुल्ला यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शनिवारी झालेल्या जोरदार हल्ल्यांनंतर इस्रायलने ही मोहीम सुरू केली. इस्रायलचे म्हणणे आहे की, एप्रिलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर शनिवारी हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर सर्वाधिक रॉकेट आणि इतर हल्ले केले. या वाढत्या हल्ल्यांनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक भागांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि काही कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

