Thursday, 22 Apr, 7.02 pm सामना

ठळक
जालन्यात मृताच्या बोटाचे ठसे घेत फोन पेव्दारे रक्कम लांबवली; नातेवाईकांची पोलीसांत तक्रार

कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांच्या ठशांचा आणि मोबाईलचा गैरवापर करत फोनद्वारे रक्कम लांबविल्याची घटना 15 एप्रिलला जालना येथील कोरोना रुग्णालयात घडली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.

जुना जालना भागात राहणाऱ्या कचरू मानसिंग पिंपराळे (40), यांना एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर 13 एप्रिलला संध्याकाळी सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयात भरती केले होते. 14 तारखेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास या रुग्णाला अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलविण्यात आले. आणि त्यानंतर 15 एप्रिलला सकाळी सात वाजेच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर तेथील कर्मचारी मोमीन मोसिन निसार याने मृताच्या बोटांच्या ठशांचा वापर करत मोबाईल ओपन केला आणि त्यामधून पे -फोनद्वारे दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या खात्यावर सहा हजार रुपये वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन वेळा प्रयत्न करून पैसे जात नसल्यामुळे तिसऱ्यावेळी पैसे सुरज योगराज मांडोले या व्यक्तीच्या खात्यावर वळवले. त्यावेळी सहा हजार आठशे एवढी रक्कम त्याच्या खात्यावर वळवण्यात आली.

सुरज योगराज मांडोले हा जळगाव येथील तरुण कामानिमित्त जालन्यात राहतो. त्यांची आणि मोमीन मोसिन निसार याची तोंडओळख होती. त्यामुळे, मोमीन याने मांडोले यांच्या खात्यावर पैसे वळवेले आणि हे पैसे जमा झाल्यानंतर मांडोले याने दोन मिनिटानंतर लगेच ही रक्कम पुन्हा मोमिन यांच्या खात्यात वळवली. सध्या मांडोले हे काही कामानिमित्त जळगावला गेले आहेत.

सकाळी सात वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मोबाईलवर एटीएमचे ओटीपी घेऊन पिन बदलून आणि मृताच्या ठसा वापर करून हा प्रकार घडला आहे. 15 एप्रिलला ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी मृताच्या नातेवाईकांनी मोबाईलची पाहणी केली असता ही रक्कम वळवल्याचे उघड झाले आहे. नातेवाईकांनी या रकमेसोबतच मृताच्या खिशामध्ये उपचारासाठी दिलेले 40 ते 42 हजार रुपये आणि अन्य काही साहित्यही चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक कदीम जालना पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पैसे वळवणाऱ्या मोमीन मोसिन मोमीन निसार या तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुलीही दिली आहे. तांत्रिक अडचणींमुळे पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करून न घेता आज सकाळी पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु, दुपारी दोन वाजेपर्यंत मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा न नोंदविता पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने दिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top