नेपाळ एअरलाईन्सने (Nepal Airlines) गुरुवारी त्यांच्या एका 'नेटवर्क मॅप' मध्ये जम्मू-कश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर, 'नकाशात शास्त्रीयदृष्ट्या मोठ्या त्रुटी होत्या' म्हणत माफी मागितली आहे.
जम्मू-कश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवल्यामुळे हिंदुस्थानच्या सोशल मीडियावर यासंदर्भात नेपाळ एअरलाईन विरोधात तीव्र शब्दात टीका झाली होती. हिंदुस्थानी नागरिकांच्या संतापानंतर एअरलाईन्सने बुधवारीच आपली ती सोशल मीडिया पोस्ट हटवली.
नेपाळ एअरलाईन्सने ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, ‘आमच्या सोशल मीडिया चॅनेलवर अलीकडेच शेअर केलेल्या नेटवर्क मॅपमधील चुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. त्या नकाशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमांच्या संदर्भात नकाशात शास्त्रीयदृष्ट्या मोठ्या त्रुटी होत्या. ते नकाशे चुकीने वापरले गेले असून नेपाळ किंवा नेपाळ एअरलाईन्सची ती अधिकृत भूमिका नाही’.

