जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात मंगळवारी दोन ठिकाणी ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि अनेक भागांतील रस्ते बंद झाले आहेत. सुदैवाने यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
सरथलच्या गहान परिसर आणि मच्छीपाल भागात ही ढगफुटी झाली असून, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. रस्ते पूर्ववत करण्यासाठी यंत्रसामग्री तैनात करण्यात आली असून, नागरिकांना पाण्याच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
उपायुक्त पंकज शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, जंगल परिसरात ढगफुटी झाल्यामुळे वृक्षाला-ट्रोफिक मार्ग, वृक्षाला झीरो पॉईंट, मच्छीपाल, सरूर आणि विशेषतः सरथल गावाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. तसेच पुराचे पाणी निवासी वस्त्यांच्या आजूबाजूच्या भागात शिरले आहे.
रस्ते पूर्ववत करण्यासाठी आणि ढिगारा हटवण्यासाठी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, जेसीबी मशिन्स आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची पथके आपत्कालीन भागात पाठवण्यात आली आहेत. द्रबशल्ला आणि गुज्जुवा दरम्यान ढगफुटी झाल्यामुळे द्रबशल्ला झीरो पॉईंट, सुरू-सरथल, गहान आणि मच्छीपाल मार्गांवर मोठा परिणाम झाला. उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रबशल्लापर्यंतचा मुख्य महामार्ग मोकळा करण्यात आला असून त्यापुढील मार्ग खुला करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे.

